पुण्यातील १० करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. जे रुग्ण संशयित आहेत त्यांनी १४ दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावं, ज्या विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे त्यांनी आपल्या घरामधेच थांबावं अशाही सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही असंही म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या परीक्षा नाहीत त्यांनी बाहेर फिरू नये त्यासाठीची दक्षता आम्ही घेतो आहोत. याबाबत पालकांनाही सूचना देणार आहोत असंही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं. वसतिगृहं रिकामी करावी का? असाही प्रश्न काही संस्थाचालकांनी. मात्र हा निर्णय संबंधित विद्यापीठांचा असेल असं आम्ही सांगितलं आहे.

वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी त्यांच्या पालकांनी घ्यायची आहे. त्याबाबत आम्ही पालकांना सूचना देणार आहोत असंही म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. करोनाग्रस्त भागातून विद्यार्थ्यांना इथे येण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पुण्यात येणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे असंही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं. सॅनेटायझर्समध्ये भेसळ करणाऱ्या तिघांना काल अटक करण्यात आली आहे. या व्यक्ती भेसळ करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही तातडीने ही कारवाई केली अशीही माहिती म्हैसेकर यांनी दिली.