14 October 2019

News Flash

दस का दम! जगातील तिसऱ्या उंच शिखरावर पुण्यातील १० जणांनी फडकावला तिरंगा

पुण्यातील दहा गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करत तिरंगा फडकावला आहे

पुण्यातील दहा गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील दहा जणांच्या संघानं आज सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आठ हजार ५८६ मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे तर भारतातील पहिले शिखर आहे.

माउंट कांचनजुंगा शिखरावर आत्तापर्यंत चारशे गिर्यारोहकांनी झेंडा फडकावला आहे. कांचनजुंगा शिखर चढणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे या गिरीप्रेमींनी शिखराची चढाई केली आहे. ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम ठरली आहे. पर्यावरण संवर्धनाचं संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने (अतिउंचावरील माती आणि दगड) या मोहिमेत गोळा करण्यात आले.

गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. याआधी माउंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से, माउंच मकालू, माउंट धैलागिरी, माउंट मनास्लुवर आणि माउंट च्यो ओयु मोहिमा फत्ते केल्या आहेत. सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक नेते आहेत.

First Published on May 15, 2019 1:12 pm

Web Title: 10 mountaineers from pune summit mt kangchenjunga