जेजुरी वार्ताहर
पुरंदर तालुक्यात आज करोना रुग्णांनी शंभरी पार करत १०१ चा आकडा गाठला. यामध्ये ७० टक्के रुग्ण सासवड शहरातील आहेत.या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.एकट्या सासवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ झाली आहे.आज तालुक्यातील तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यातील दोन रुग्ण सासवड मधील नवे रुग्ण असून एक ग्रामीण भागातील धनकवडी येथील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.गेल्या दोन दिवसात सासवड शहरातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने सासवडमधील नागरिकांनी संपूर्ण लॉकडाउन करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली होती.याशिवाय प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत होती.त्यामुळे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी शुक्रवारपासून आठ दिवस संपूर्ण शहर लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सासवड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.नगरपालिका  पोलीस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.लॉक डाउन केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होऊन सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.सासवडमध्ये लॉकडाउनची शिस्त व्यवस्थित पाळली जात आहे की नाही.हे पाहण्यासाठी पालिकेने आठ पथके तैनात केली आहेत.पुणे येथे नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बरेचजण नियम पाळत नसल्याने कोरोनाचा प्रसार झाला.आता याबाबत नियम केलेले असून बाहेरून ये-जा करणाऱ्यांनी पालिकेत नोंदणी करणे,वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे असे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी बजावले आहेत.

संपूर्ण पुरंदर तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बहुतांशी गावात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.दोन दिवसाच्या तुलनेत आज सासवडमध्ये रुग्णसंख्या घटल्याचे चित्र आहे.आज फक्त तीन रुग्ण सापडले आहेत.