भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गेल्या १२० वर्षांतील हवामानाच्या नोंदी स्वतंत्र संकेतस्थळाद्वारे उपलब्ध केल्या आहेत. या नोंदींसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, हवामान अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता डाऊनलोड करता येतील.
हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाकडे सन १९०० पासूनच्या नोंदी संग्रहित आहेत. गेल्या १२० वर्षांत सातत्याने घेतलेल्या नोंदींचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. राष्ट्रीय विदा केंद्र (एनडीसी) आणि हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील क्लायमेट रीसर्च अँड सव्र्हिस (सीआरएस) यांनी या नोंदींचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करून या नोंदी खुल्या केल्या आहेत.
देशभरात २०० वेधशाळा आणि ३००हून अधिक उपवेधशाळा हवामान विभागाच्या माध्यमातून चालवल्या जातात. तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या (एडब्ल्यूएस) अंतर्गत हवामान केंद्र आणि प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी) आहेत. हवामानाच्या अंदाजांची प्रारूपे ठरवण्यासाठी अचूक नोंदी आवश्यक असतात. स्थानिक नोंदी आणि उपग्रहाकडून आलेल्या नोंदी राष्ट्रीय विदा केंद्रात साठवल्या जातात. हवामानाच्या नोंदींमध्ये तापमान, उष्मा, पाऊस, हवेचा दाब आदी घटक दिवसभरातून आठ वेळा नोंदवले जातात. या सर्व नोंदी विदा संकेतस्थळावर पाहता येतील. http://cdsp. imdpune. gov.in या संकेतस्थळावर हा विदा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील क्लायमेट रीसर्च अँड सर्व्हिसचे प्रमुख डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, की हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी संग्रहित आहेत. गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतीने नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे पूर्वीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्यात आले. नव्या संकेतस्थळाद्वारे त्या-त्या वेळची निरीक्षणे, वातावरणातील बदल, पाऊस, चक्रीवादळे आदींच्या नोंदी पाहता येतील. हा विदा डाऊनलोडही करता येईल. आतापर्यंत या विदाची मागणी झाल्यास तो पुरवण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे काही महिने जात होते. मात्र आता हा विदा संकेतस्थळावरून कधीही हवा तेव्हा उपलब्ध होऊ शकेल.
संशोधनाला चालना : विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना या विदाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येऊ शकतो. शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी आता उपलब्ध झाल्याने तापमान, पाऊस, चक्रीवादळे अशा विविध घटकांशी संबंधित झालेली वाढ किंवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास, त्यातून झालेले बदल यांबाबतचे संशोधन या विदाच्या आधारे करणे शक्य आहे. त्यामुळे देशातील हवामानाशी संबंधित संशोधनाला या संकेतस्थळाद्वारे चालना मिळू शकते, असेही डॉ. डी. शिवानंद पै यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 12:40 am