पुणे शहरात दिवसभरात २९२ करोनाबाधित आढळले, तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ७७ हजार ८७२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ४ हजार ६१३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. दरम्यान ४७० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर पुण्यात १ लाख ६९ हजार १६२ जण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९४ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, १०४ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९६ हजार १३७ वर पोहचली असून, यापैकी ९२ हजार ७७९ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७६६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असल्याचं दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येसह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. आज दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, दिवसभरात २ हजार १२४ जणांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १९ हजार ५५० वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट ९४.२९ टक्के आहे. सध्या राज्यात ५९ हजार २१४ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.