सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पुणे मॅरेथॉन स्पर्धा रविवारी एकदाची ‘पार’ पडली. इथोपियाच्या गेटाचेव बेशा याने ही स्पर्धा जिंकली. मात्र, त्याच्या विजयापेक्षा स्पर्धेचे ढिसाळ आयोजन आणि स्पर्धकांचा अल्प प्रतिसाद याचीच चर्चा जास्त रंगताना दिसली. शर्यतीकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तकात या शर्यतीस भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ (एएफआय) व आंतरराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स महासंघ (आयएएएफ) यांची परवानगी घेतली असल्याचे छापण्यात आले होते. मात्र, एएफआयने ३० नोव्हेंबर रोजी सर्व अ‍ॅथलेटिक्स संघटनांना व खेळाडूंना पत्र पाठवून स्पर्धेला परवानगी नाकारल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत साशंकताच होती. आज स्पर्धकांची रोडावलेली संख्या पाहता ही शक्यता खरी ठरली. या सगळ्या वादांमुळे महापालिकेतर्फे स्पर्धेचे आयोजन करूनही महापौर, आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी याठिकाणी उपस्थित राहणे टाळले. त्यामध्ये आज स्पर्धा सुरू झाल्यानंतर ढिसाळ कारभाराची भर पडली. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या कार्यक्रमाचा एकूणच विचका झाला, असे म्हणावे लागेल. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपाला  महापौर मुक्ता टिळक, पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि आमदार मेधा कुलकर्णी यांना पाचारण करून आयोजकांनी आपली पत सांभाळण्याचा प्रयत्नही केला.

या स्पर्धेची सुरूवात आणि सांगता ज्या सणस मैदानावरून होणार होती त्याठिकाणी अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. संघटकांकडूनच सणस मैदानावरील ट्रॅकवरच तंबू रोवण्यात आले होते. ट्रॅकवर कोणतेही बांबू ठेवू नये किंवा तेथे पत्रे ठोकू नयेत असा सर्वसाधारण नियम आहे. किंबहुना ट्रॅकवर क्रीडा बुटांखेरीज अन्य कोणतीही पादत्राणे आणू नयेत असेही संकेत आहेत. तथापि मॅरेथॉन संयोजकांनी तेथील ट्रॅकवरच बांबू रोवले होते. त्यामुळे तेथे सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अ‍ॅथलेटिक्स संघटकांकडूनच असे अडथळे निर्माण केले जाणे ही शोकांतिका असल्याचे मत काही खेळाडूंनी व्यक्त केले होते.