पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने तारांकित हॉटेलमध्ये शेफ असलेल्या महिलेला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

वानवडी भागात राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला एका तारांकित हॉटेलमध्ये शेफ आहे. काही दिवसांपूर्वी तिला एकाने फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने विनंती स्वीकारल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला. त्या वेळी चोरटय़ाने परदेशात मोठय़ा पदावर काम करत असल्याची बतावणी केली होती. महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर त्याने महिलेला भेटवस्तूचे पाकिट पाठविण्यात आले असून त्यापोटी कुरिअर कंपनीकडे काही पैसे भरावे लागतील, अशी बतावणी केली होती. महिलेने एकाच्या खात्यात ८० हजार रूपये भरले. दरम्यान, भेटवस्तू न मिळाल्याने महिलेला संशय आला. तिने फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राच्या मोबाइल क्रमांकावर  संपर्क साधला. मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आल्याने तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भापकर तपास करत आहेत.