पुणे : करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ४२५ विमानांमधून आलेल्या ५२,२२९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंगळवापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया येथून ५२,२२९ प्रवासी दाखल झाले. त्यांपैकी २९७ प्रवासी महाराष्ट्र राज्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांमध्ये ८७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यांपैकी ८६ जणांचे  वैद्यकीय नमुने तपासले असता त्यांना करोनाचा संसर्ग नसल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या सर्वाना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १ संशयित रुग्ण पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल आहे.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३९ विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यांमध्ये ३६१ बेड्स उपलब्ध आहेत. कें द्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरिता करण्यात येतो आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २९७ प्रवाशांपैकी २२१ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.