राजकीय उलथापालथ आणि नाटय़मय घडामोडींमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात गुरूवारी ५७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या वेळच्या ४४.७१ टक्क्य़ांच्या तुलनेत आताचे मतदान प्रचंड वाढलेले असल्याने जनतेचा कौल कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. मतदार याद्यांमधील घोळ, व्होटिंग मशीनवरून झालेल्या तक्रारी वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक विभागाने म्हटले आहे. निवडणूक काळातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तथापि, राजकीय पक्षांमध्ये वादंग न होता पोलिसांचीच अनेक घटकांशी तीव्र वादावादी झाल्याचे दिसून आले.
मावळ लोकसभेच्या िरगणात महायुतीचे श्रीरंग बारणे, शेकापचे लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर, ‘आप’चे मारूती भापकर यांच्यासह १९ उमेदवार असून त्यांचे भवितव्य गुरूवारी मतपेटीत बंद झाले. मावळातील १९ लाख ५२ हजार मतदारांपैकी जवळपास सव्वा अकरा लाख (५७ टक्के) इतके मतदान झाल्याचा अंदाज आहे. तांत्रिक अडचणींमुळे माहिती प्राप्त होण्यास उशीर होत असल्याचे सांगून याबाबतची अधिकृत व सविस्तर माहिती शुक्रवारी दुपारी दिली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी िशदे यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढले असल्याने विविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तथापि, सर्वच प्रमुख उमेदवारांनी विजयी होण्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
सकाळी मतदानाचा वेग संथ होता. रस्त्यांवरही फारशी गर्दी नव्हती. तथापि, साडेआठनंतर मतदार मोठय़ा संख्येने दिसू लागले. पहिल्या दोन तासात ६.५६ टक्के मतदान झाले होते. पुढच्या दोन तासात वेग वाढला. अकरा वाजेपर्यंत १६. ६५ टक्के, दुपारी तीनपर्यंत ३८.५८ टक्के, पाच वाजेपर्यंत ५२.३९ टक्के मतदान होऊ शकले. यंदा मतदानाची मुदत सायंकाळी सहा वाजेपर्यंत असल्याने शेवटी मतदानाची टक्केवारी ५७ झाली. नवमतदारांमध्ये मतदानाविषयी तीव्र उत्सुकता होती. वाकड, िपपळे सौदागर भागात मोठय़ा संख्येने राहणाऱ्या आयटी क्षेत्रातील मतदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी मतदारसंघाच्या विविध भागातून येत होत्या. त्यातून निवडणूक कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली. सरकारी स्लिपांचा फायदा झाल्याचे सांगणारे नागरिक आढळून येत होते. तसेच, मतदार यादीत नावे नसल्याने ती शोधणाऱ्यांची गर्दीही ठिकठिकाणी होती. सहाही विधानसभा मतदारसंघात वोटिंग मशीन बिघडल्याच्या १३ तक्रारी झाल्या, त्यानंतर मशीन तातडीने बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
पोलिसांशीच वादावादी
संवेदनशील भाग असल्याने िपपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारी नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तथापि, पोलिसांशीच वाद झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. निवडणूक कर्मचाऱ्यांवरच एका फौजदाराने दमदाटी केल्याचा प्रकार कासारवाडीत घडला. कर्मचारी व फौजदारातील या वादात मतदान केंद्रात सकाळीच तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. थेरगावातील प्रेरणा शाळेत आजारी वडिलांना मतदानासाठी घेऊन आलेल्या एका इसमास पोलीस कायद्याचा बडगा दाखवत होते. मात्र, तेच पोलीस राजकीय कार्यकर्त्यांपुढे मूग गिळून गप्प बसल्याने नागरिक संतापले होते. वाकडला शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याशी जोरदार वाद झाला.
 
नेते, अभिनेते, उद्योगपतींनी सकाळीच उरकले मतदान
आमदार लक्ष्मण जगताप यांनी सकाळी सात वाजता िपपळे गुरव येथे, महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी आठ वाजता थेरगावात, तर ‘आप’ चे मारूती भापकर यांनी मोहननगरला साडेआठ वाजता मतदान केले. आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत असल्याने त्यांना मावळात मतदान करता आले नाही. अभिनेत्री कु. सोनाली कुलकर्णी हिने प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधनी विद्यालयात तर प्रियांका यादव हिने चिंचवडला मतदान केले. ज्येष्ठ उद्योगपती राहुलकुमार बजाज व राजीव बजाज यांनी आकुर्डीत मतदान केले.