पुणे :  वीजबिलांच्या अभूतपूर्व थकबाकीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीच्या आवाहनाला पुण्यासह पश्चिाम महाराष्ट्रातील अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. या विभागातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ४ लाख ५४ हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या २३ दिवसांमध्ये ५७९ कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. गेल्या १ एप्रिल २०२० पासून या ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नव्हते. मात्र वीजबिल भरण्यास सर्वच थकबाकीदार ग्राहकांनी आता वेग दिला आहे.

सद्यङ्मस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक २६ लाख ४७ हजार वीजग्राहकांकडे एकूण १६९० कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये अद्यापही १ एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या ९ लाख ३२ हजार वीज ग्राहकांकडे असलेल्या ६८७ कोटी ९७ लाख रुपयांचा समावेश आहे. या सर्वच ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. मात्र वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कोंडी गंभीर झाली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत २३ फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ५३३ ग्राहकांनी ३०१ कोटी ९१ लाख, सातारा – ५९ हजार २६५ ग्राहकांनी ५१ कोटी ५२ लाख, सोलापूर – ८५ हजार ८२५ ग्राहकांनी ८१ कोटी २२ लाख, कोल्हापूर – ७८ हजार ९०९ ग्राहकांनी ८४ कोटी ९६ लाख व सांगली जिल्ह्यातील ६० हजार ५६३ ग्राहकांनी ६० कोटी ३१ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व ग्राहकांनी गेल्या एप्रिल २०२० पासून प्रथमच वीजबिलाचा भरणा केला आहे.

८०,८०० ग्राहकांची वीज तोडली

वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा न केल्यामुळे आतापर्यंत पश्चिाम महाराष्ट्रात सुमारे ८० हजार ८०० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा १४४ कोटी ९२ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. आर्थिक अडचण असल्यास वीजग्राहकांना महावितरणकडून हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शनिवार-रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी २७ आणि २८ फेब्रुवारीला सुरू राहणार आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची http://www.mahadiscom.in ही वेबसाइट, मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.