राज्य सरकारच्या वतीने मुंबई, रायगड, बारामती, रायगड, सातारा, चंद्रपूर, गोंदिया व नंदूरबार या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोशीत बोलताना दिली. रुग्णांच्या दृष्टीने डॉक्टर हा देवासमान आहे. हे देवत्व डॉक्टरांनी टिकवून ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मोशी प्राधिकरण येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. अजय चंदनवाले, रुग्णालयाचे संचालक डॉ. जवाहर भळगड, डॉ. सुहास कांबळे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अनु गायकवाड, डॉ. विनायक माने, डॉ. अनिल खाडे, डॉ. विलास साबळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डॉक्टरांचा नेहमीच तुटवडा भासतो, त्यासाठी राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे नियोजन आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना आता लोप पावत चालली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक रुग्णालयांमध्ये येतात. बेड रिकामा आहे म्हणून मुंबईत रुग्णाला गरज नसतानाही दाखल करून घेतले जाते, तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ देऊ नका. डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्णांचा जीव वाचवत असतात, मात्र डॉक्टरांवर हल्ले होतात, तसे होणे चुकीचेच आहे. या वेळी संचालक डॉ. जवाहर भळगड, महापौर लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सुहास कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. डॉ. विलास साबळे यांनी आभार मानले.