विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पुण्यातील एका तरुणाला तब्बल १२,४०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे. अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांच्या नावे असणाऱ्या थकीत दंडाची वसुली करण्यासाठी पुण्यातील पोलीस सध्या मिशन मोडवर आहेत. याचाच एक भाग म्हणून या तरुणाला इतका मोठा दंड भरावा लागला.

काही दिवसांपूर्वी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला पुण्यातील वाहतूक पोलिसांनी अडवले आणि त्याच्या दुचाकीवरील दंडाची तपासणी केली. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी विविध २५ प्रकारचे ई-चलान संबंधीत तरुणाच्या दुचाकीवर पेडिंग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या सर्व दंडांची मिळून १२,४०० रुपये इतकी एकत्रित रक्कम त्याला भरावी लागली.

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पुणे शहरात सर्व महत्वाच्या चौकांमध्ये एकूण १२०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि पोलिस मुख्यालयातील कन्ट्रोल रुमद्वारे यावर थेट निगराणी ठेवली जाते. कन्ट्रोल रुममधील पोलीस कर्मचारी सीसीटीव्हीचे फुटेज तपासतात आणि ज्या वाहनाने नियमभंग केला आहे त्या क्रमांकाच्या वाहनावर ऑनलाइनपद्धतीने ई-चलान पाठवतात. वाहतुकीच्या नियमभंगांमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर किंवा स्टॉपलाईनपुढे वाहन थांबवणे आदींचा समावेश असतो.

त्यामुळे संबंधीत चौकात पोलीस कर्मचारी नसताना वाहतुकीचे नियम मोडणे पुणेकरांना महागात पडत आहे. कारण, काही दिवसांनंतर जर पोलिसांनी संबंधीत चालकाच्या वाहनावर ई-चलान आहे की नाही याची तपासणी केल्यास सर्व दंडाची रक्कम एकदम भरावी लागते ही रक्कम हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध नाही.

आठवड्याभरापूर्वी पुण्यात एका एसयुव्ही कार चालकाकडून २४,२०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला होता. तर पुणे महापालिकेची सार्वजनीक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपी बस चालकाकडूनही वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल १४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.