शिक्षण विभागाचा अजब इशारा; अद्याप ६० लाख नोंदणी शिल्लक

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी सरल प्रणालीत न केल्यास दिवाळीच्या तोंडावर पगार देण्यात येणार नाही, असा अजब धमकीवजा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अभ्यासक्रम शिकवण्याचे मुख्य काम सांभाळून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची कसरत शिक्षकांना पूर्ण करावी लागणार आहे. अद्याप राज्यात पटावर असलेल्या ६० लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नसल्याने शिक्षकांसाठी पुढील महिना भीतीदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची माहिती ‘सरल’ या प्रणालीच्या माध्यमातून संकलित करण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती देताना आधार क्रमांकही नोंदवायचे आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे विविध लाभ आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरलवर नोंदवण्यात आले आहेत, तेच विद्यार्थी गृहीत धरून त्यानुसार संचमान्यता करण्यात येणार आहे. म्हणजेच आधार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गृहीत धरून त्यानुसार शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या संचमान्यतेसाठी यंदा ३० सप्टेंबपर्यंत निश्चित झालेली विद्यार्थीसंख्या गृहीत धरण्यात येईल. संचमान्यतेचे तपशील भरण्यासाठी म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत मुदत आहे. त्यामुळे आता महिन्याभरात आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, तांत्रिक अडचणींशी सामना करत आधार क्रमांक सरलवर नोंदवणे अशी कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही काम संपवण्यासाठी मुदत दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात वेतन नाही

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार विविध टप्प्यांवर भरण्यात येणाऱ्या या माहितीसाठी शिक्षण विभागाकडून मुदत ठरवून देण्यात आली आहे. सप्टेंबर अखेपर्यंत आधार क्रमांकाची नोंदणी झाली नाही तर ऑक्टोबरचे वेतन न देण्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. ‘दिवाळीच्या महिन्याचा पगार न देणे शासनास आवडणार नाही. त्यामुळे अशी वेळ शासनावर आणू नये,’ असे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील ५९ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप नसल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

  • राज्यातील पहिली ते बारावीचे विद्यार्थी – २ कोटी २४ लाख
  • सरलमध्ये आधार नोंदणी झालेले विद्यार्थी – ७५ लाख ६० हजार
  • आधार नोंदणी झाली, पण पडताळणी शिल्लक – ८८ लाख ७६ हजार
  • आधार क्रमांकच नाहीत असे विद्यार्थी – ५९ लाख ६४ हजार