छपाई यंत्रे, बनावट मुद्रांक पोलीस ठाण्याच्या आवारात; खटल्याची सुनावणी सुरू असल्यामुळे विल्हेवाटीस मनाई

कोटय़वधी रुपयांचा बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या मृत्यूनंतर त्याने केलेला घोटाळा पुन्हा उजेडात आला. तेलगीच्या मृत्यूनंतर तत्कालीन राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत तेलगीचे असलेलय़ा संबंधावर प्रकाश पडला आहे. तेलगीने छापलेले कोटय़वधींचे मुद्रांक, छपाई यंत्रे आणि त्याच्या आलिशान मोटारी पोलिसांकडून जप्त करण्यात आलय़ा होत्या. हा सगळा मुद्देमाल पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडला आहे. गेली चौदा वर्ष या बनावट मुद्रांक खटल्याची सुनावणी सुरू असल्यामुळे तेलगीच्या जप्त मुद्देमालाची विल्हेवाटदेखील लावता येत नाही. त्यामुळे तेलगीचा मुद्देमाल पोलीस ठाण्याच्या आवारात अक्षरश: धूळ खात पडला आहे.

तेलगीला विविध कलमांखाली तेरा वर्ष शिक्षा आणि शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता; तसेच गुन्हा कबूल केलेल्या अन्य आरोपींना वेगवेगळी शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हा कबूल न केलेल्या तेरा आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्याचे कामकाज शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सुरू आहे. त्यात आमदार अनिल गोटे, कर्नाटकचे माजी मंत्री चेन्ना बायन्ना, कृष्णा यादव, निलंबित पोलीस अधिकारी श्रीधर वगळ, महंमद चाँद मुलाणी, दिलीप कामत, गोकुळ पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, दत्तात्रय डाळ तसेच तेलगीचा पुतण्या परवेज तेलगी, तेलगीची पत्नी शाहिदा तेलगी यांचा समावेश आहे. सध्या या खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात सुरू आहे. अद्याप या खटल्याचा अंतिम निकाल लागला नसून गेली चौदा वर्ष या खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयात सुरू आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या अब्दुल करीम तेलगीविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल होता. कर्नाटक पोलिसांकडून या प्रकरणात तेलगीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात कर्नाटक पोलिसांकडून हजर करण्यात आले होते. बनावट मुद्रांक प्रकरणात तेलगीसह एकूण ६७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट मुद्रांक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीकडून बनावट मुद्रांक प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय)सोपविण्यात आला होता. यासंदर्भात तेलगीचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार म्हणाले की, बनावट मुद्रांक प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मुद्रांक घोटाळ्यात पोलिसांकडून छपाई यंत्रे, बनावट मुद्रांक, तेलगीच्या मोटारी, घडयाळ, अंगठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत न्यायालयाकडून निर्णय घेतला जातो किंवा त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू होते.

महागडी मोटार, मौल्यवान ऐवज जप्त

खटल्याचा निकाल लागेपर्यंत मुद्देमाल सरकारच्या ताब्यात असतो. तेलगीने बनावट मुद्रांक छापण्यासाठी वापरलेली छपाई यंत्रे, मुद्रांक स्वारगेट पोलीस ठाण्याच्या आवारात लाखबंद करून ठेवण्यात आली आहेत. त्याच्या मोटारी रामटेकडीतील सीबीआयच्या कार्यालयाच्या आवारात लावून ठेवण्यात आल्या आहेत, तसेच घडय़ाळ, अंगठी असा मौल्यवान ऐवज बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षाकडे जमा आहे, असे अ‍ॅड. मिलिंद  पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

बनावट मुद्रांक प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून करण्यात आला. तेलगीच्या भिवंडी, मुंबईतील गोदामावर छापे टाकून  पोलिसांनी मुद्रांक छपाईसाठी वापरलेली यंत्रे, मुद्रांक तसेच अन्य साहित्य जप्त केले होते. तेलगीची आलिशान मोटार पोलिसांकडून जप्त करण्यात आली होती. हा सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर तो पोलीस ठाण्यांच्या आवारात आणून लाखबंद करण्यात आला. या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुद्देमालाची विल्हेवाट लावता येत नाही. हा मुद्देमाल सरकारजमा आहे.

सी. एच. वाकडे, तत्कालीन तपास अधिकारी, विशेष तपास पथक