मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. एक्स्प्रेस वेवरील अमृतांजन पुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर पलटला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, काही वेळापूर्वीच हा कंटनेर रस्त्यावरून दूर करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (टी एस-१६, यू बी – ३३२६) यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये लतीफ खाज़ामिया शेख (वय-५२ रा.मार्किट रोड,बालाजी मंदिराजवळ मुकदमाबाद,नांदेड़) यांचा मृत्यु झाला. अमृतांजन पुलाखालचे वळण घेताना कंटेनर थेट पुलाच्या खांबावर जाऊन आदळला. यामध्ये कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.