सिग्नल तोडल्यामुळे वाहनांचा अपघात होऊन जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १८४ नुसार धोकादायकरीत्या वाहन चालविल्याची कारवाई केली जाऊ शकते. यापुढे सिग्नल तोडणाऱ्यांवर या कलमांचा अधिक प्रभावी वापर करून कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
‘टीम लोकसत्ता’तर्फे नुकतीच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांची प्रत्यक्ष दहा चौकांमध्ये जाऊन पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील तब्बल एक-तृतीयांश वाहनचालक थेट सिग्नल तोडत असल्याचे पाहायला मिळाले. या पाहणीबाबत पांढरे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कारवाई आणखी परिणामकारक करणार असल्याचे स्पष्ट केले.
सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईबरोबरच जनजागृती करणे आवश्यक आहे. सिग्नलला जास्त वेळ थांबावे लागत असल्यामुळेही सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सिग्नलचे वेळापत्रक बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक भागातील पोलीस अधिकाऱ्यास त्यांच्या भागातील चार ते पाच सिग्नलकडे येणाऱ्या वाहनांच्या गर्दीचा अभ्यास करून सिग्नलच्या वेळामध्ये काय बदल करता येईल याच्या सूचना दिल्या आहेत. सिग्नलचा वेळ कमी झाल्यास सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी होईल.
‘अनेक सिग्नल्सना टायमर नाहीत’
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २८१ सिग्नल आहेत. यातील बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे आणि सर्व सिग्नलला टायमर बसविण्याच्या सुचना महापालिककडे करण्यात आल्या आहेत. याबाबत त्यांना वेळोवेळी सूचित केले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच होत नाही. किमान महत्त्वाचे सिग्नल घेऊन त्या ठिकाणी टायमर बसविण्यास सुरुवात केली तर वाहन चालकांना सिग्नलवर कितीवेळ थांबायचे हे समजेल. वाहनांची संख्या वाढल्यामुळे चौकात वाहतुकीचे नियम करण्याचे काम यंत्रावरच केले जाणे अपेक्षित आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे.

जनजागृती हा महत्त्वाचा भाग
एकच व्यक्ती सिग्नल तोडते, नो एंट्रीत शिरते, नाे पाकिंगमध्ये वाहने लावते. त्यामुळे त्या व्यक्तीवर कारवाई करणे शक्य होत नाही. मात्र, त्याच व्यक्तीला वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती केल्यानंतर तो नियम तोडणार नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमाबाबत सतत वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती केली जाते. रोटरी क्लब, लायन्स यांना सोबत घेऊन नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची पत्रके वाटली जातात. विविध कार्यक्रमांतून वाहतुकीच्या नियमाची माहिती दिली जाते. शाळेच्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच रोड सेफ्टी पेट्रोलच्या माध्यमातून (आरएसपी) वाहतुकीच्या नियमाबाबत शिक्षण दिले जाते. वाहतूक नियमांबाबत लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

गेल्या वर्षी १.२१ कोटींचा दंड जमा
गेल्या वर्षी (२०१३) सिग्नल तोडणाऱ्या एक लाख १५ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून तब्बल एक कोटी २१ लाख ५३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, २०१४ एप्रिलपर्यंत ४८ हजार ४४५ वाहन चालकांवर कारवाई करून ५० लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.
 
समन्स पाठवण्याची योजना
वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रत्येक चौकात उभे राहून दरवेळी कारवाई करणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी यावर एक उपाय शोधला आहे. पोलीस शिपाई चौकात उभे राहून सिग्नल तोडणाऱ्या वाहनांचे क्रमांक फक्त लिहून घेईल. त्यानंतर वाहनांची सर्व माहिती काढून वाहन चालकास नियम तोडल्याबाबत समन्स पाठविले जाईल. या योजनेवर सध्या काम सुरू आहे. सिग्नलवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाचशे हवालदारांची गरज आहे. त्याबाबत प्रस्तावही पाठविला आहे. कारवाईचे अधिकार पोलीस हवालदारांचे असतात. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने हे अधिकार पोलीस नाईक यांना देण्यात यावेत, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वाहतूक शाखेला सध्या १४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १०६० लोक प्रत्यक्ष कामावर आहेत.
.
 
‘सिग्नलच्या वेळा सदोष’
पुण्यातील बहुतांश सिग्नलवर वाहनांनी थांबण्याच्या वेळा दिवसभर एकसारख्याच आहेत. त्यासाठीचा अवधी सकाळ, दुपार, सायंकाळनुसार कमी-जास्त केला जात नाही. वाहतुकीची जी व्यस्तता सकाळी सात वाजता असते ती दुपारी बदलते. सायंकाळी त्याहून बदलते. त्यामुळे वाहने सिग्नलला थांबण्याच्या अवधीत बदल करणे आवश्यक आहे. मात्र, हे पुण्यात घडताना दिसत नाही. ही वाहतूक पोलिसांची जबाबदारी असते.
‘इंडियन रोड काँग्रेस’ एखाद्या चौकातून विशिष्ट संख्येने वाहने जात असतील तरच नवीन सिग्नल बसवावेत. ते नसतानाही पुण्यात सिग्नल बसवलेले आहेत. अशा प्रकारचे ४० सिग्नल मध्ये बंद करण्यात आले होते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार ते पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पुण्यातील सिग्नल सकाळी सात ते रात्री अकरा या काळात सुरू असतात. ते सरसकट सुरू न ठेवता त्या त्या भागातील वाहतुकीच्या व्यस्ततेनुसार त्यात बदल केला जावा. हे बदल केले तर सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल.
– महेंद्र शिंदे (कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका)