विसर्जन मार्गावर तपासणी नाके; पोलीस आयुक्तांचे आदेश

गणेशोत्सव काळात आढळून येणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी घेतला आहे. त्यानुसार, दारू पिणाऱ्यांना ताब्यात घेतले जाणार असून दारूचे साठे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. विसर्जन मिरवणुका जाणाऱ्या मार्गावर तपासणी करणारे नाके (चेक पोस्ट) उभारण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवात दारू पिणाऱ्यांवर कारवाई करा, कोणीही असो त्याची गय करू नका, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगवीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होते. उत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे आणि उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली होती.

त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उत्सवकाळात दारू पिणारे कार्यकर्ते फिरकू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. दारूचा साठा कोणी करू नये, यावर पोलिसांची करडी नजर आहे. एखादा दारू पिलेला इसम आढळून आल्यास त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. खबरदारीच्या कारणास्तव मंडळांची तपासणी केली जात आहे. विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी तपासणी नाके असणार आहेत.