पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावला यांनी दिली. करोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे अशी माहितीही अदर पुनावाला यांनी दिली. करोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार अशीही माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण माहिती दिली. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.  जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं.

अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.  आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अदर पुनावाला यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

करोनाने फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर संकट आणलं आहे. अशात लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट दिली. पुण्यात आल्यानंतर त्यांनी कोविशिल्ड लशीची संपूर्ण माहिती घेतली. लशीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचं लक्ष आहे असं अदर पुनावाला यांनी सांगितलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशीबाबत संपूर्ण माहिती घेतली असंही अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.