‘स्पर्श’ रुग्णालयाला तीन कोटींची देयके दिल्याचे प्रकरण भोवले

पिंपरी : पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) अजित पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. ‘स्पर्श’ रुग्णालयाला स्वत:च्या अधिकारात तीन कोटींची देयके देण्यावरून सभेत त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यामुळे त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले. अखेर, हे प्रकरण भोवल्याने त्यांना ‘कार्यमुक्त’ करण्यात आले.

पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या बाबतचे आदेश दिले. पुणे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, अशी मूळ नियुक्ती असलेल्या पवारांकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभारही होता. शासनाने त्यांचा हा पदभार कायम ठेवण्याविषयी कोणतेही आदेश दिले नव्हते. या कारणास्तव पवारांना ‘कार्यमुक्त’ केल्याचे आयुक्तांनी आदेशपत्रात नमूद केले.

सप्टेंबर २०१९ ला पालिकेत रुजू झालेल्या पवारांनी सुरुवातीच्या काळात बरीच धडाडी दाखवली. करोना संकटकाळात त्यांनी चांगली कामगिरी केली. नंतर, मात्र, ते सातत्याने वादात राहिले. ‘स्पर्श’ रुग्णालयावर कृपादृष्टी दाखवल्याचे प्रकरण त्यांना भोवले. करोनाचे रुग्ण बरेच कमी झाले होते. त्या काळात एकही करोना रुग्ण दाखल नसलेल्या ‘स्पर्श’ रुग्णालयाला स्वत:च्या अधिकारात त्यांनी तीन कोटी १४ लाख रुपयांची देयके दिली. याची माहिती उघड झाल्यानंतर पवारांना राष्ट्रवादी काँग्रेससह अनेकांनी खिंडीत गाठले. पालिका सभेत आयुक्तांसमोरच झालेल्या आरोपांची दखल घेऊन आयुक्तांनी पवारांचे आर्थिक अधिकार काढून घेतले. त्यानंतर, पवार १८ ते ३१ मार्चपर्यंत सुटीवर गेले. त्यानंतर, या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. अखेर, बुधवारी अचानक आयुक्तांनी पवारांना कार्यमुक्त केले.