प्रशासनाचा अंदाज; दैनंदिन चाचण्यांमध्ये करोना बाधित सापडण्याचे प्रमाण कमी

पुणे : ऑगस्टअखेपर्यंत शहरात ८३ हजार सक्रिय रुग्णांचा अंदाज प्रशासनाने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात वर्तवला होता. मात्र, आता प्रशासनाकडूनच ऑगस्टअखेरीस शहरात ३८ हजार सक्रिय रुग्ण असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सध्या दैनंदिन चाचण्यांमध्ये करोना बाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठ दिवसांचा विचार के ल्यास ३१ ऑगस्टपर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून एकू ण सक्रिय रुग्णांचा आकडा ६२ हजार २६८ असेल. या रुग्णांचा अंदाज गेल्या आठ दिवसांत बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार काढण्यात आला आहे. त्यापैकी पुणे शहरातील सक्रिय रुग्णसंख्येचा अंदाज ३२ हजार ते ३८ हजार असेल.

सध्या पुणे शहरात १६ हजार सक्रिय रुग्ण असून त्यांमध्ये १६ हजार ते २२ हजार एवढी रुग्णांची वाढ होईल, तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून सध्या २७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यांमध्ये ३५ हजार २०८ रुग्णांची वाढ होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे, असेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

शहरात ३१ जुलैपर्यंत बाधितांचा आकडा ६० हजार होऊन त्यापैकी २७ हजार सक्रिय रुग्ण असतील. १५ ऑगस्टपर्यंत एक लाख बाधित होऊन त्यापैकी ४६ हजार सक्रिय रुग्ण असतील, तर ऑगस्टअखेरीला शहरात बाधितांचा आकडा दोन लाखांपर्यंत जात त्यापैकी ८३ हजार ५०० रुग्ण सक्रिय असण्याचा अंदाज होता. त्यामध्ये ३० टक्के  म्हणजेच २५ हजार ५० रुग्ण पुण्याबाहेरचे असतील, असा अंदाज महापालिका प्रशासनाकडून २७ जुलै रोजी व्यक्त करण्यात आला होता.

दहा दिवसांत ८२५ खाटांची वाढ; चार दिवसांत ५०० खाटांची उपलब्धता

पुणे : जुलै अखेरीला वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ३० जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत ससूनसह खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू आणि कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या ८२५ खाटा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच येत्या चार दिवसांत ससूनमध्ये ३५० आणि नवले रुग्णालयात १५० अशा ५०० खाटा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिली.

सध्या प्राणवायूच्या खाटांवर ३१००, अतिदक्षता विभागात ५५०, तर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ५७० रुग्ण आहेत. प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणेवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाहता मोठी करोना काळजी केंद्रे आवश्यक आहेत. त्यानुसार पुणे आणि पिंपरी येथील दोन्ही मोठय़ा करोना काळजी केंद्रांचे काम वेगाने सुरू असून १९ ऑगस्टपर्यंत ही केंद्रे सुरू होतील. या दोन्ही केंद्रांमध्ये १६०० खाटा उपलब्ध होतील. त्याकरिता ९० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ५० टक्के  राज्य सरकार, २५ टक्के  पुणे महापालिका, १५ टक्के  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि उर्वरित खर्च जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी), कं पन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) के ला जाणार आहे.दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिके कडून ऑटो क्लस्टर आणि बालनगरी (भोसरी) येथे करोना काळजी केंद्र उभारण्यात येत आहे. हे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ५०० खाटा उपलब्ध होणार आहेत.

‘एसएसपीएमएस’ करोना काळजी केंद्राचा निर्णय अधांतरी

गेल्या दहा दिवसांत बाधितांपेक्षा उपचाराअंती बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने खासगी रुग्णालयांमधील खाटा उपलब्ध असण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ५५ कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या खाटा रिकाम्या आहेत. त्यापैकी १४ खाटा पुणे पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमधील आहेत. तसेच सीओईपी आणि मगर क्रीडांगण येथील मोठी करोना काळजी केंद्रे २० ऑगस्ट रोजी कार्यान्वित होणार असल्याने मोठय़ा प्रमाणात खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल (एसएसपीएमएस) येथील मोठे करोना काळजी केंद्र सुरू करायचे किं वा कसे? याबाबत येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाईल.