करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील एक फेरी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता तीनऐवजी दोनच फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे या बाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. पदविका प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, त्या संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात पात्रता निकष, प्रवेश प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीबाबत स्वतंत्र आदेश प्रसिद्ध केले जातील.

या प्रक्रियेद्वारे दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. तर बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. आतापर्यंत या प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेऱ्या घेतल्या जात होत्या. यंदा तीनऐवजी दोनच फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू असेल. अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येईल. या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव असतील.

तंत्रशिक्षण (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबद्दलची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात काही बदल करण्यात आले आहेत. राज्यातून दहावी झालेले विद्यार्थी या प्रक्रियेसाठी पात्र असतील. तर यंदा तीनऐवजी दोनच फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल.

– डॉ. डी. आर. नंदनवार, सहसंचालक, तंत्रशिक्षण