24 September 2020

News Flash

आघारकर संस्थेने साकारले ‘हिमोग्लोबिन कॅलक्युलेटर किट’

हिमोग्लोबिन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन कॅलक्युलेटरची निर्मिती करण्यात आली

हिमोग्लोबिन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन कॅलक्युलेटरची निर्मिती करण्यात आली

रक्तातील लाल पेशींचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे ही भारतात महिला आणि लहान मुलांमध्ये नियमित आढळणारी समस्या आहे. यावर उपाय म्हणून आघारकर संशोधन संस्थेतर्फे घरच्या घरी हिमोग्लोबिन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन कॅलक्युलेटरची निर्मिती करण्यात आली असून मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि आघारकर संस्थेतील संशोधकांनी तयार केलेले हिमोग्लोबिन मोजणारे किट यांच्या साहाय्याने ही तपासणी अचूक आणि कमी खर्चात करता येणे शक्य होणार आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ प्रसाद कुलकर्णी आणि पीएच.डी. चे विद्यार्थी नीरज घाटपांडे यांच्या संशोधनातून हे किट तयार झाले आहे. रक्ताचा नमुना या किट मध्ये दिलेल्या वेलप्लेट मधील एका भागामध्ये घेऊन तो हिमोकोर या द्रावणाबरोबर मिसळला जातो. दुसऱ्या वेलमध्ये हिमोकोर हे द्रावण घेतले जाते. मोबाइल मधील अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने या दोन्ही वेल्सचे छायाचित्र घेतले जाते. अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने दोन्ही छायाचित्रांमधील गणिती सूत्रांची पडताळणी केली जाते आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या मोबाइल वर दाखवले जाते. आघारकर संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या या किटचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर अवघ्या २५ ते ३० रुपयांत हे किट नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा वापर कसा करावा याबद्दलची माहिती देखील त्या बरोबर देण्यात येणार आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ प्रसाद कुलकर्णी म्हणाले, महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या सार्वत्रिक आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये त्याबद्दलच्या तपासणीसाठी सोयी उपलब्ध नाहीत. ही गोष्ट लक्षात घेता हे किट ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांकडे देणे शक्य आहे. त्यांना प्रशिक्षण दिले असता या किटचा वार करून त्या ग्रामीण भागातील महिलांचे हिमोग्लोबिन तपासून योग्य ते उपचार करू शकणार आहेत. नीरज घाटपांडे म्हणाले, ३०० शाळकरी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे हिमोग्लोबिन प्रयोगशाळेत तपासण्यात आले. ७ ते १६ ग्रॅम हिमोग्लोबिन असलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची क्रमवारी ठरवून घेण्यात आली. कोणत्याही रंगामध्ये लाल, हिरवा आणि निळा रंग समाविष्ट असतो, हिमोग्लोबिनच्या प्रमाणानुसार प्रत्येक रंगाच्या तीव्रतेत कसा फरक पडतो याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर हिरव्या रंगात होणारा बदल हिमोग्लोबिन मोजण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडला. त्या आधारावर ३०० नमुन्यांचे गणिती सूत्र निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे किटच्या साहाय्याने हिमोग्लोबिनची तपासणी केलेल्या रक्ताच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेले हिमोग्लोबिनचे प्रमाण ताडून पाहण्यात आले असता हे संशोधन यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे.

आघारकर संशोधन संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या हिमोग्लोबिन कॅलक्युलेटर किटच्या मदतीने घरच्या घरी, कमीत कमी खर्चात हिमोग्लोबिनची तपासणी करणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 4:20 am

Web Title: agharkar research institute develop hemoglobin colorimetric detection kit
Next Stories
1 सरकारच्या नावीन्यपूर्ण धोरणांमुळे झालेल्या प्रगतीचा अभ्यास आणि विश्लेषण व्हावे
2 वयाने मोठे असले तरी मोघे हा माणूस यार वाटला
3 घरबसल्या वीजबिल भरणाऱ्यांची संख्या सव्वाआठ लाखांवर!
Just Now!
X