नगर जिल्ह्य़ातील खर्डा या गावात दलित तरुणाच्या हत्येचा जो अमानुष प्रकार घडला त्याच्या जाहीर निषेधासाठी आणि धिक्कारासाठी सामाजिक न्याय परिषदेतर्फे सोमवारी (५ मे) पुण्यात धरणे आंदोलन केले जाणार आहे. रामदेवबाबा यांच्या बेलगाम वक्तव्याचाही निषेध या वेळी केला जाईल.
सामाजिक न्याय परिषदेतर्फे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जामखेड तालुक्यातील खर्डा या गावात नितीन आगे या सतरा वर्षांच्या दलित तरुणाची अमानुष हत्या करण्यात आली. ही घटना केवळ दुर्दैवीच नाही, तर ती महाराष्ट्राच्या प्रतिमेलाही कलंक लावणारी आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी परिषदेतर्फे सोमवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण खोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपाध्यक्ष पंडित कांबळे हेही या वेळी उपस्थित होते. या विषयासंबधीची संवेदना व्यक्त करण्यासाठी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पुण्यातील व्यक्ती, संस्था, संघटना यांनाही करण्यात आले आहे. नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन देण्यात येणार आहे त्याच्यावर याचवेळी स्वाक्षऱ्याही संकलित केल्या जाणार आहेत.
नगर जिल्ह्य़ात गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे तीन तरुणांची हत्या करण्यात आली होती. त्यातील आरोपींवर अद्यापही कठोर कारवाई झालेली नाही. खर्डा येथील घटनाही अशाच प्रकारची आहे आणि ही समाजाची शोकांतिका आहे. राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाने संवाद वाढवल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. सामाजिक संवाद कमी पडत असल्यामुळेच असे प्रकार घडत असून त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे, असेही परिषदेचे म्हणणे आहे. रामदेवबाबा यांनी राहुल गांधींसंबंधी जी विधाने केली आहेत, त्या बेलगाम आणि असंस्कृत भाषेचा तीव्र निषेध या धरणे आंदोलनात केला जाणार आहे.