अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गिरवले हे अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आरोपी होते. तसेच, ते संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जात.

कैलास गिरवले यांना अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कैलास गिरवलेच्या मृत्यूनंतर बाबासाहेब गिरवले यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये अहमदनगर पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कैलास गिरवलेंच्या मृत्यूला अहमदनगर पोलीस कारणीभूत असून, त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे. कैलास गिरवले यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.