लघू-मध्यम उद्योगांबाबत अजय ठाकूर यांचे मत; ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’ला भरभरून प्रतिसाद

शेअर बाजारात नावनोंदणी करून त्याद्वारे भांडवलाची उभारणी केलेल्या अनेक लघू आणि मध्यम उद्योगांनी कोटय़वधी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे. भविष्यात लघू आणि मध्यम उद्योजकांना यशस्वी होण्यासाठी उद्योगाची शेअर बाजारात नावनोंदणी हेच यशाचे गमक असल्याचे मत मुंबई शेअर बाजाराच्या लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे प्रमुख अजय ठाकूर यांनी बुधवारी व्यक्त केले.

‘सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ प्रस्तुत ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’ परिषद उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. ‘केसरी’ सहप्रायोजक असलेल्या या परिषदेत दोनशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले होते. उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त सहसंचालक व्ही. एल. राजाळे आणि सारस्वत बँकेचे महाव्यवस्थापक अभिजित प्रभू यांनीही या वेळी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.

अतिरिक्त सहसंचालक राजाळे यांनी लघू आणि मध्यम उद्योगांच्या राज्यातील सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या क्षेत्रातील बहुतांश उद्योग हे  पारंपरिक पद्धतीने चालवले जातात, त्यांमध्ये नवनिर्मितीचा अभाव आहे, त्यामुळे या उद्योगाला मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्याचे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. अभिजित प्रभू म्हणाले, अर्धा टक्का कमी व्याजदराला भुलून, सल्लागारांनी सांगितलेल्या पतपेढय़ांमधून कर्ज घेऊन अनेकदा उद्योजक अडचणीत येतात. हे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य बँकेतून कर्जाची रक्कम घेतल्यास उद्योजकांनाही त्याचा उपयोग होणार आहे.

लघुउद्योजक म्हणतात ..

सरकारने घेतलेला वीजदरवाढीचा निर्णय लघुउद्योगांच्या हिताचा नाही. महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसी) समन्वयाचा अभाव असल्यामुळे एमआयडीसीतील उद्योजकांना रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत.   -संदीप बेलसरे, अध्यक्ष, लघुउद्योग संघटना

प्लास्टिकवर बंदी आणल्यामुळे अनेक कंपन्यांची कामे बंद झाली आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकला परवानगी द्यावी. प्लास्टिक उद्योगाचे क्लस्टर तयार केल्यास त्याचा फायदा उद्योजकांना होईल.   – योगेश बाबर, प्लास्टिक उद्योजक संघटना

पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र औद्योगिक नगरी म्हणून ओळख मिळावी. राज्यातील एमआयडीसीच्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी उद्योजकांची सल्लागार समिती नेमावी.   – अ‍ॅड्. अप्पा शिंदे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघू, मध्यम उद्योग संघटना

पिंपरी-चिंचवडमधील कारखान्यांमधून सोडले जाणारे रासायनिक पाणी नद्यांमध्ये मिसळून पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी सरकारने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करावा.    – सुरेश म्हेत्रे, माजी अध्यक्ष – लघुउद्योग संघटना

कोटय़वधी रुपयांचा महसूल देणाऱ्या उद्योजकांना वेळेवर वीज मिळत नाही. एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडीमुळे अनेक कामगारांना कामावर पोहोचायला उशीर होतो. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.  – विकास ऊर्फ आबा ताकवणे, उद्योजक

शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये लघू आणि मध्यम उद्योगांचा समन्वय साधण्यासाठी एक समिती नियुक्त करावी. आजारी उद्योगांसाठी स्वतंत्र महामंडळ तयार करावे.    – गोविंद पानसरे, अध्यक्ष, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज