राष्ट्रवादीतील हेवेदावे, धुसफुस कायम

‘गटबाजी’, ‘हेवेदावे’, ‘पाडापाडी’, ‘तू मोठा, की मी मोठा’ अशा वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तीन-तेरा’ वाजले. मावळ-शिरूर लोकसभेच्या जागांवर मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. बालेकिल्ला असूनही पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभेच्या जागा गेल्या. जवळपास १५ वर्षे ताब्यात असलेली महापालिकाही हातातून गेली. एवढे होऊनही काही सुधारणा झालेल्या नाहीत. आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादीने त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करत राज्यभर मेळावे सुरू केले आहेत. कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यासाठी अजित ‘दादा’ आले आणि गेले. मात्र, पक्षातील धुसफुस कायम आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या धावत्या दौऱ्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे वर्तुळ ढवळून निघाले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या मेळावे आणि बैठकांच्या माध्यमातून पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न पवार, तटकरे यांनी संयुक्तपणे केला. या निमित्ताने पवारांनी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. कारण, राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत, त्या दृष्टीने राज्यभरात त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. ‘मोठे साहेब’ त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र पालथा घालत आहेत. तर, अजित पवार, सुनील तटकरे ही जोडी त्यांच्या पद्धतीने विस्कटलेली घडी नीट करतानाच पक्षाची वातावरणनिर्मिती करत आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याकडे किमानपक्षी तटकरे यांचा कौल दिसून येतो. तसे थेट विधान त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यात केलेही. राष्ट्रवादीच्या दृष्टीने एकेक जागा महत्त्वाची असल्याचे सांगत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघजिंकून द्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. वास्तविक, विधानसभेच्या पिंपरी-चिंचवडमधील हक्काच्या तीन जागा राष्ट्रवादीने का गमवल्या, याचा विचार पक्षाने करायला हवा. भोसरी विधानसभेत बंडखोरीमुळे विलास लांडे यांचा तर पिंपरी विधानसभेत पक्षातील गटबाजीमुळे अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला, हे उघड गुपित आहे. तो कोणी केला, कोणी-कोणी त्यात योगदान दिले, याची माहिती सर्वश्रुत आहे. भोसरीत राष्ट्रवादीचीच नेते म्हणवून घेणाऱ्यांची मोठी फळी लांडे यांच्या पराभवासाठी कार्यरत होती. ते पवारांना रोखता येणे शक्य होते. मात्र, तसे प्रयत्न झाले नाहीत. बंडखोर निवडून आला काय आणि अधिकृत उमेदवार आला काय, आपलाच आमदार होणार, हा सोयीस्कर दृष्टिकोन ठेवण्यात आला व त्यामुळेच घात झाला. पिंपरीत अपेक्षित चुरस नसल्याने अण्णा बनसोडे यांचा पराभव होऊ शकत नव्हता, असे प्रारंभी चित्र होते. मात्र, बनसोडे यांनी स्वत:च्या हाताने तो करवून घेतला. ऐन प्रचाराच्या काळात बनसोडे काय-काय करत होते, हे पाहून त्यांच्या समर्थकांनी डोक्याला हात लावला होता. इतकेच काय, तर पक्षातील नेत्यांचे फोन न घेणे, प्रचारातून मधूनच गायब होणे, अतिरेकी आत्मविश्वास बाळगणे त्यांच्या अंगाशी आले. असे असताना, चिंचवडच्या मेळाव्यास त्यांनी मारलेली दांडी सूचक आणि सर्वाचे लक्ष वेधून घेणारी होती. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीला तगडा उमेदवार देता आला नाही. राष्ट्रवादीने ज्यांना उमेदवारी दिली, त्या नाना काटे यांनी शिवसेनेशी जवळपास घरोबा केलाच होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात हातातोंडाशी आलेली शिवसेनेची उमेदवारी त्यांच्या हातातून गेल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातात घातले.

विधानसभा निवडणुकांना तीन वर्षे झाली असली, तरी शहरातील राजकीय परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. विलास लांडे राष्ट्रवादीत कायम राहिले तर त्यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर राहील. पर्याय म्हणून दत्ता साने, अजित गव्हाणे अशी नव्या दमाची नावे पुढे येऊ शकतील. पिंपरीत बनसोडे यांच्या उमेदवारीला तूर्त आव्हान नाही. पुढे-मागे चित्र बदलूही शकते. चिंचवडला तीच परिस्थिती आहे. तगडय़ा भाजप आणि तितकेच आव्हान देऊ शकणाऱ्या शिवसेनेपुढे निभाव लागेल, असा उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. प्रशांत शितोळे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर अशी नावे चर्चेत राहतील. नव्या चेहऱ्याचा शोधही होत राहील. या ‘जर-तर’च्या गोष्टी झाल्या. दरम्यानच्या काळात, राजकीय पटलावर बरीच उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर राजकीय गणिते बदलू शकतात. शहराची ‘व्यक्तिनिष्ठ’ राजकारणाची परंपरा लक्षात घेता, कोणीही नेता कोणत्याही पक्षाला लाथ मारून कोणत्याही नेत्यासोबत जाऊ शकतो. असा एखादाच नेता असेल, ज्याने पक्ष बदललेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभेची मोर्चेबांधणी करत असताना उमेदवारांची पळवापळवी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्येक पक्षाचे आडाखे वेगळे राहणार असून प्रत्येकाचा मनातील उमेदवार आणि चर्चेतील उमेदवार वेगळा असणार आहे.

‘बलाढय़’ राष्ट्रवादीला लोकसभेच्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. विधानसभेचे तीनही उमेदवार पराभूत झाले आणि सरतेशेवटी पिंपरी महापालिकाही हातातून गेली. राष्ट्रवादीचे ‘रथी-महारथी’ पक्ष सोडून गेले. चांगले उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे पक्षाची अवस्था नाजूक झाली आहे. ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, त्याचा बोध घ्यायला कोणी तयार नाही. पक्षातील धुसफुस, गटबाजी कायम आहे. अजित पवारांना शहराचे सगळे राजकारण पूर्णपणे माहिती आहे. ते येथील कारभारावर नाराज आहेत, हे लपून राहिले नाही. मात्र, ही नाराजी त्यांनी तूर्त बाजूला ठेवली आहे. उपमुख्यमंत्रिपदावर असतानाचा मानपान, रुबाब अनुभवलेल्या अजित पवारांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खुणावते आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे किमान १०० आमदार निवडून येण्याची गरज आहे. एकेक आमदार वाढवायचा आहे. हक्काच्या तीन जागाजिंकून त्यांना पिंपरी-चिंचवडपासून सुरुवात करायची आहे. एका मेळाव्यासाठी आले आणि भाषण करून गेले म्हणजे येथील गढूळ झालेली परिस्थिती निवळणार नाही. स्थानिक नेत्यांवर विसंबून न राहता त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले, तर काहीतरी फरक पडू शकतो. अन्यथा, पक्षाच्या जोरावर मोठे झालेले नेतेच पक्षाला मातीत घालण्याची परंपरा कायम ठेवतील, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

अजित पवारांचा ‘कानमंत्र’

विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना ‘कानमंत्र’ दिला आहे. नाउमेद होऊ नका, खचून जाऊ नका, नव्या जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि पालिकेतील गटनेते योगेश बहल यांना समन्वयाने काम करण्याची तंबी दिली आहे. जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त करा, विरोधी पक्षात असलो म्हणून काय झाले, कामात सातत्य ठेवा, जनतेचे प्रश्न हाती घ्या. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करा. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे बाजूला ठेवा, कट्टर कार्यकर्त्यांना ताकद द्या. काम करणाऱ्यांना पदे द्या, ‘दोन नंबर’वाले बाजूला ठेवा. पक्षाची एकजूट दाखवा, संघटना मजबूत करा. लेटरहेड छापणे, नुसतेच मिरवणे म्हणजे पक्षाचे काम नव्हे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा. जशास तसे प्रत्युत्तर द्या, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.