प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात पार पडला. पण, यावेळी अजित पवार यांनी शिवथाळी नाकारली. पण, असं करण्यामागचं योग्य कारणही त्यांनी दिलं.

राज्यात आमची सत्ता येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थित नागरिकांसोबत अजित पवार यांनी संवाद साधला.

आणखी वाचा : पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन 

पुण्यात शिवभोजन थाळी कुठे मिळेल?

उद्घाटनानंतर दादा थाळीची टेस्ट करा असा, आग्रह काही पत्रकारांनी केला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत शिवभोजन थाळी नाकारली. ते म्हणाले की, ‘मी जेवलो तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. अजित पवार यांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला.’ अजित पवारांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार पुढे म्हणाले की, पण इतक्या लवकर मी जेवत नाही, आरे मी दीक्षित डायटवर आहे.

ऐपत असणाऱ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेऊ नये –

यावेळी अजित अजित पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शिवभोजन थाळी देणार, त्या घोषणेप्रमाणे आम्ही गोरगरिबांसाठी थाळी देत आहोत. या थाळीचा गरीब होतकरू यांनी लाभ घ्यावा, ज्यांची ऐपत आहे. त्यांनी लाभ घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा देखील विचार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. पुण्यात सात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चार ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आले. तयार स्वयंपाकगृह आणि २५ माणसे एकाचवेळी जेऊ शकतील, अशी व्यवस्था असणाऱ्यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येईल.