राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये करोना आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये पुण्यातील सर्व लोकप्रितिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.  पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देत असल्याचं अजित पवारांनी या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना एका पत्रकाराने तुम्ही लस घेतली का असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देताना, “होय रे बाबा, मी लस घेतली आहे. मला इतरांसारखा लस घेताना फोटो काढायचा नव्हता. अशी नौटंकी मला आवडत नाही,” असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आणखी वाचा- “नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन!” पुणे-पिंपरी चिंचवडकरांना अजित पवारांचा २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!

लसीसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये एक टोलाही लगावला. “इतरांनी फोटो टाकल्यानंतर अनेकांनी ती लस घेतली. मी जर लस घेताना फोटो काढला असता तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती”, असं अजित पवार यांनी म्हणताच सर्वजण हसू लागले. एक मार्चपासून देशभरामध्ये ६० वर्षांवरील नागरिक आणि इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत अनेक मान्यवरांनी लस घेतानाचे फोटो पोस्ट करत लस सुरक्षित असून पात्र असणाऱ्या सर्वांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. मात्र अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अशाप्रकारे लस घेताना फोटो काढणं हे नौटंकी असल्याचा टोला लगावला आहे. अशी नौटंकी आपल्या आवडत नसल्याने आपण लस घेताना फोटो काढला नाही असा खुलासा अजित पवारांनी केला.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी लॉकडाउनचा निर्णय सध्या घेण्यात आलेला नसल्याचं सांगितलं. “लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा”, अस आवाहन अजित पवारांनी केलं आहे.