राज्याची परदेशी लस खरेदीप्रक्रिया रखडली; अजित पवार यांची स्पष्टोक्ती 

पुणे : करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना लशींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसखरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्राने त्यास परवानगी दिली नसल्याने निविदा प्रक्रियाच रखडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त लशी उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप परदेशी लसखरेदीसाठी राज्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जागतिक निविदा काढण्याची प्रक्रिया रखडली आहे.’’ जागतिक निविदा काढण्यासाठी महापालिकांना मात्र राज्य सरकारची परवानगी आवश्यक नसल्याचेही पवार यांनी या वेळी स्पष्ट के ले.

पुण्यातील करोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘‘जागतिक निविदा काढण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राने परदेशी लस खरेदी करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. ती मिळाल्यानंतर तातडीने जागतिक निविदा काढली जाईल.’’ सध्या केवळ रशियाची स्पुटनिक, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम उत्पादित कोविशिल्ड या तीन लशींच्या खरेदीसाठी परवानगी आहे. त्यामुळे इतर परदेशी लशींच्या किंमती अद्याप ज्ञात नाहीत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

लसखरेदीचा पालिकांना अधिकार!

’लसखरेदीचे अधिकार महापालिकांना आहेत. त्याकरिता राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. मुंबई महापालिके ने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

’पुणे महापालिकाही परदेशी लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढत आहे. त्यानुसार राज्यातील इतर महापालिकाही जागतिक निविदा काढू शकतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्रातर्फे राज्यांना १५ दिवसांत एक कोटी ९२ लाख लसमात्रा

नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या एक कोटी ९१ लाख ९९ हजार मात्रा १६ ते ३१ मे या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. त्यापैकी एक कोटी ६२ लाख पाच हजार मात्रा कोव्हिशिल्डच्या आहेत, तर २९ लाख ४९ हजार मात्रा कोव्हॅक्सिनच्या आहेत.

‘स्पुटनिक’ची मात्रा ९४८ रुपयांना

रशियातून आयात केलेल्या या लशीच्या मात्रेची किंमत ९४८ रुपये असून त्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर लागू आहे. स्थानिक पातळीवरील पुरवठ्यात लशीची किंमत थोडी कमी होण्याची शक्यता आहे. भारतात आता देशात उत्पादित झालेल्या दोन आणि परदेशातून आलेली एक अशा तीन लशी उपलब्ध झाल्या आहेत.