प्रशासनाकडून आरोपाचे खंडन

पुणे : राज्यात वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीला दोन उमेदवार अनुपस्थित असतानाही चाचणी परीक्षेत उत्तीर्ण करून त्यांची नियुक्ती वनरक्षक पदावर करण्यात आली आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तर परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवरील भरतीसाठी आयटी विभागाच्या महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे परीक्षा घेतली जाते. महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे जून-जुलैमध्ये ९०० वनरक्षक पदासाठी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. यात १२० गुणांची लेखी ऑनलाइन परीक्षा, तर ८० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. या लेखी परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र झाले. औरंगाबाद एमआयडीसी परिसरात झालेल्या शारीरिक चाचणीच्या वेळी सुरुवातील १०० उमेदवारांना बोलवण्यात आले. या पैकी दोन उमेदवारांकडे डॉक्टरांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणपत्र) नसल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली नाही.

प्रशासनाचे प्रतिनिधी आणि उमेदवारांसमोर हा प्रकार घडला. मात्र, सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या दोन उमेदवारांची नावे परीक्षा उत्तीर्णाच्या यादीत दाखवण्यात आली आहेत. या शिवाय त्यांना चाचणीमध्ये ८० पैकी ७० गुण दिले आहेत. प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यांसाठी हे अन्यायकारक आहे. संबंधित उमेदवारांनी फिटनेस प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिल्याचे उमेदवारांनी सांगितले.

उमेदवारांची शारीरिक चाचणी सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली. उशिरा आलेल्या एकूण २० उमेदवारांची चाचणी नंतर घेण्यात आली. त्याचे ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. अनावश्यक अपप्रचार करण्यात येत असल्याचे औरंगाबाद विभागाचे उपवनसंरक्षक सतीश वडसकर यांनी सांगितले.