सध्या हापूस आंब्याचा मोसम नसतानाही त्याची चव तुम्हाला चाखायला मिळणार आहे. कारण, हा बिगरमोसमातला हापूस आंबा कोकणातून नव्हे तर थेट अफ्रिकेतून भारतात आला आहे. पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये हा आंबा दाखल झाला आहे.

अफ्रिका खंडातल्या मालवी देशातून हा आंबा पुण्यात दाखल झाला असून या आंब्याला पुणेकर ग्राहकांची पसंती मिळत आहे. आफ्रिका खंडातील मालवी देशातील एका उद्योजकाने ‘मालावी मँगोज’ ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या मार्फतच हा आंबा भारतात आयात करण्यात आला आहे, अशी माहिती मार्केटयार्डमधील आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी दिली.

रत्नागिरीतील दापोली कृषी विद्यापीठातून हापूस आंब्याची ४० हजार कलमं या उद्योजकाने मालवी देशात नेली होती. तिथे सातशे हेक्टरवर या कलमांची त्याने लागवड केली. गेल्या वर्षीपासून मालवीचा हा हापूस आंबा, पुण्यात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

आपल्या हापूस आंब्याप्रमाणेच या आंब्याची चव असून मागील वर्षीचा ग्राहकांचा प्रतिसाद पाहून यंदा १६०० पेट्या पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये दाखल झाल्या आहेत. एका पेटीमध्ये एक किंवा दीड डझन आंबे असून १८०० ते २२०० रुपयांना एक पेटी याप्रमाणे या अंब्याची विक्री केली जात आहे.