बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पुणे जिल्ह्य़ातील मावळ आणि शिरूर या दोन्हीही मतदार संघात स्थानिक समीकरणे प्रभावी आणि निर्णायक ठरली. भाजपची साथ मिळाल्याने श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ मतदार संघात सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आला. सर्व गणिते जुळून आल्याने शिरूरमधून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. मावळात पवारांना तर शिरूरमध्ये आढळरावांना पराभवाचा धक्का बसला.

eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
Satyajit Patil Sarudkar
महाविकास आघाडीच्या ताकदीवर निवडून येणार; सत्यजित पाटील सरूडकर यांना विश्वास
wardha lok sabha
वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश, उमेदवारीवर शिक्कामोर्तब

मावळ लोकसभा भाजप तसेच शिवसेनेला अनुकूल असाच मतदार संघ आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे होते. तरीही, मावळवर सुरुवातीपासून भाजपचा डोळा होता. दोन्हीही पक्षांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले, तरी मावळचा तिढा कायम होता. मावळातून कोणी निवडणूक लढायची, हाच कळीचा मुद्दा बनला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार, मावळात आपली ताकद जास्त आहे, शिवसेनेचा उमेदवार टिकणार नाही, असे सांगत भाजपने शेवटपर्यंत आटापिटा केला. पण, मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा आहे, असे गणित ठेवून वाटचाल करणाऱ्या भाजपने फारशी ओढाताण न करता शिवसेनेला हा मतदार संघ सोडला. त्यानंतर मुद्दा होता, तो म्हणजे खासदार बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील पराकोटीला गेलेल्या वादाचा. बराच काथ्याकूट झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यात मनोमीलन झाले. खरे पाहता, दोघांनी आपापला स्वार्थ पाहिला होता. त्यामुळे त्यांच्यातील दिलजमाई किती खरी आणि किती खोटी, हे त्या दोघांनाच माहिती असेल. भाजप-शिवसेनेतील संघर्ष संपला आणि बारणे-जगताप एकत्र आले, तेव्हाच मावळात युतीचा उमेदवार निवडून येणार, हे स्पष्ट झाले होते. पवार कुटुंबातील उमेदवार समोर असल्याने एकतर्फी निवडणूक होणार नव्हती, इतकेच.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवार मावळातून रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष मावळकडे लागले होते. पार्थ हा नामधारी उमेदवार होता. अजित पवार हेच निवडणूक लढवत असल्याचे चित्र सुरुवातीपासून होते. त्यांनी मतदार संघात तळ ठोकला. प्रचाराची सारी सूत्रे स्वत:कडे घेतली. सर्वपक्षीय प्रमुखांशी संवाद साधला. हजारो नागरिकांना दूरध्वनी केले. राज्यातील इतर मतदार संघातील विशेषत: बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर मावळात राष्ट्रवादीची मोठी फौज दाखल झाली. शेवटच्या दोन दिवसांत पैशाचा प्रचंड धूर करण्यात आला. एवढे सारे होऊनही पवारांना निवडणूकजिंकता आली नाही. महायुतीची एकवटलेली ताकद आणि तुलनात्मकदृष्टय़ा दोन्ही उमेदवारांचा विचार करता, लादलेला नवखा उमेदवार मतदारांनी नाकारून अनुभवी भूमिपुत्राला पसंती दिली. दोन लाख १५ हजार मतांच्या फरकाने पुत्र पराभूत झाल्याने अजितदादांना मोठा धक्का बसला. पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, शहर राष्ट्रवादीत सध्या स्मशानशांतता आहे. मावळजिंकल्यानंतर शहरातील तीन विधानसभा आणि त्यानंतर महापालिकाजिंकण्याच्या मनसुब्यांवर तूर्त कोणीही भाष्य करण्याच्या मन:स्थितीत नाही.

आता चांगल्या कामगिरीची अपेक्षा

सलग तीन वेळा चढत्या मताधिक्याने खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूरमधून पराभूत करून राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे जायंट कीलर ठरले आहेत. शिरूर लोकसभेसाठी एकतर राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता. कोणीच लढायला तयार नाही म्हणून मीच निवडणूक लढतो, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आमदार दिलीप वळसे पाटील यांना लढण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नांचा तो भाग होता. प्रत्यक्षात अजितदादा लढण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि वळसे पाटीलही िरगणात उतरले नाही. परिणामी, २००९ मध्ये आढळरावांसमोर लढलेल्या विलास लांडे यांनाच तयार करण्यात आले. पैलवान मंगलदास बांदलही इच्छुक होतेच. लांडे यांना उमेदवारी मिळेल, असे निश्चित झाले असतानाच आणि लांडे यांनी उघड प्रचाराला सुरुवात केली असताना बारामतीत होणाऱ्या महानाटय़ कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि डॉ. कोल्हे यांची भेट झाली. पुढे, कोल्हे यांना पक्षात येण्याचे निमंत्रण, रीतसर पक्षप्रवेश आणि बऱ्यापैकी चाचपणी केल्यानंतर त्यांच्या उमेदवारी घोषणाही झाली. मालिका सुरू असल्याने प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ, पक्षांतर्गत रुसवेफुगवे, आर्थिक चणचण, आरोपांच्या फैरी असे अनेक अडथळे पार पाडून डॉ. कोल्हे यांनी विजयश्री प्राप्त केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील मालिका, कोरी पाटी, राष्ट्रवादीचे संघटनात्मक पाठबळ, अजित पवार, दिलीप वळसे यांचे प्रचार नियोजन, अराजकीय कार्यकर्त्यांचे परिश्रम अशा गोष्टींचा फायदा झाल्याने आढळराव यांच्यासारखा बलाढय़ उमेदवार ते पराभूत करू शकले. प्रचारासाठी अतिशय कमी वेळ देऊ शकलेल्या डॉ. कोल्हे यांना यापुढील काळात वेळेचे व्यवस्थापन करण्याशिवाय पर्याय नाही. दिलेली आश्वासने पाळण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा, वाजतगाजत चित्रपटातून राजकारणात आलेल्या आणि खासदार झाल्यानंतर पूर्णपणे अपयशी ठरलेल्या गोविंदा यांच्याप्रमाणे डॉ. कोल्हे यांची अवस्था होईल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.