‘संतसूर्य तुकाराम’ पाठोपाठ ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या संत चरित्रात्मक कादंबरीबाबतही वाद निर्माण झाला असून ‘ही पुस्तके फाडून टाका’ असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लेखक डॉ. आनंद यादव यांच्यासह मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशकांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात प्रकाशक सुनील मेहता आणि याचिकाकर्ते जयसिंग मोरे हे दोघेही न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.
आनंद यादव यांच्या या दोन्ही पुस्तकांमध्ये संतांविषयी बदनामीकारक आणि काल्पनिक मजकूर असल्याचा दावा करीत संत तुकाराममहाराज यांचे वंशज जयसिंग मोरे यांनी २००९ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. या पुस्तकांच्या प्रकाशनावर कायमस्वरुपी बंदी घाला, अशी मागणीही त्यांनी या याचिकेमध्ये केली होती. या प्रकरणी न्यायालयाने यादव आणि मेहता यांना पुस्तकातील मजकुराची पुष्टी करणारे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या दोघांना कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी या पुस्तकांच्या सर्व प्रती फाडून टाकण्याचे आदेश दिले.
या निकालासंदर्भात असमाधान व्यक्त करीत याचिकाकर्ते जयसिंग मोरे यांनी गरज पडल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी दंड न भरल्यास न्यायालयाने केवळ एक महिन्याची साधी कैद ही सुनावलेली शिक्षा कमी स्वरूपाची आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतामध्ये संत निंदा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात नाही. हा कायदा लागू करण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असेही जयसिंग मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, या निकालासंदर्भात सत्र न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे प्रकाशक सुनील मेहता यांनी सांगितले. डॉ. आनंद यादव यांनी २००९मध्ये ‘संतसूर्य तुकाराम’ हे पुस्तक मागे घेतले होते. त्यामुळे आम्ही पुस्तकाचे वितरण केलेच नाही. मात्र, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ हे पुस्तक २९ नोव्हेंबर २००५ मध्ये प्रकाशित झाले असून त्याची पाचवी आवृत्ती सुरू आहे. या पुस्तकाचे वाचकांनी भरभरुन स्वागत केले असून ही कादंबरी आवडल्याची पत्रेही आलेली आहेत. आतापर्यंत १० हजार प्रती निघाल्या असून किमान ३० हजार वाचकांनी हे पुस्तक वाचले आहे. आता पाचव्या आवृत्तीच्या ५०-१०० प्रती शिल्लक असून त्याचे वितरण थांबविले असल्याचे सुनील मेहता यांनी सांगितले.