रुग्णालयातील कोणत्याही खाटेचे अवघ्या दोन मिनिटांत अतिदक्षता विभागातील खाटेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असलेल्या ‘डोझी’ आणि नवमातांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या ‘सेव्हमॉम’ या आरोग्यविषयक नवसंकल्पनांना ‘अंजनी माशेलकर इन्क्लुसिव्ह इनोव्हेशन पुरस्कार २०२०’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मातोश्री अंजनी माशेलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. करोना महामारीच्या काळात गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या हा चिंतेचा विषय ठरला. तसेच जगातील पाच टक्के  मातामृत्यू दरवर्षी भारतात नोंदवले जातात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीतून समोर येते. या दोन्ही गंभीर समस्यांवर उपयुक्त ठरणाऱ्या दोन नवसंकल्पनांना यंदा गौरवण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘टर्टल शेल टेक्नॉलॉजी’ तर्फे  रुग्णाच्या आरोग्यावर देखरेख करणारे ‘डोझी’ तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या मुदित दंडवते आणि गौरव पारचानी तसेच ‘सेव्हमॉम’ हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ‘जिओव्हिओ हेल्थके अर’ च्या सेंथिल मुरुगेसन आणि धिनेश पांडियन यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

रुग्णाच्या बिछान्याखाली डोझी हे उपकरण ठेवल्यानंतर ते रुग्णाच्या हृदयाचे ठोके , रक्तदाब, प्राणवायूची पातळी यांच्या नोंदी ठेवते. महामारीसारख्या कालावधीत हे उपकरण वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करू शकते. सात राज्यांतील पाच हजारांवरील रुग्णांसाठी या उपकरणाचा वापर करण्यात आला आहे.

देशातील १०० पेक्षा अधिक गावांमध्ये मातामृत्यू रोखण्याच्या हेतूने नवमातेच्या आरोग्याचा लेखाजोखा घेण्यासाठी सेव्हमॉम हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मातेच्या आरोग्यविषयक नोंदी थेट डॉक्टरला कळवण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

करोना महामारीने केलेले नुकसान अभतपूर्व आहे, त्यावर मात करायची असेल तर भविष्यात नवसंकल्पनांचा हात धरुन पुढे जाण्याची गरज आहे. सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांना उपलब्ध होतील असे लाभ मिळवून देण्यासाठी नवसंकल्पना म्हणजेच ‘इनोव्हेशन’ आपल्याला मदत करेल.

– डॉ. रघुनाथ माशेलकर

साथरोगाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे दोन हजार तर देशभरात सात हजारांवर रुग्णांसाठी डोझी हे उपकरण वापरण्यात आले. भविष्यकाळात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान भारतातच नव्हे तर जगभरामध्ये सहज आणि परवडणाऱ्या कि मतीत उपलब्ध व्हावे यासाठी काम करत आहोत.

– मुदित दंडवते

आपण करत असलेल्या कामाची दखल डॉ. माशेलकर यांनी घेणे हा मोठा सन्मान आहे. संशोधनाच्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाईने तळागाळातील व्यक्तींना उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करावे, जेणेकरून त्यांच्या जीवनशैलीत काही बदल आणणे शक्य होईल.

– सेंथिल मुरुगेसन