ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जमीन अधिग्रहण कायद्याविषयी खुल्या चर्चेचे आव्हान दिले. या कायद्याला विरोध असणाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत, असे विधान काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. तेव्हा तुम्ही गडकरींशी चर्चा करणार का, असा प्रश्न अण्णांना विचारण्यात आला असता, गडकरींचा गृहपाठ कच्चा असल्याचे अण्णांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी प्रसारमाध्यमांसमोर खुल्या चर्चेला तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
लोकांना ही चर्चा बघू दे आणि सत्य परिस्थिती त्यांनाच जाणून घेऊ दे, असे अण्णांनी पत्रकारांना सांगितले. भू-संपादन कायद्यातील तरतुदींविषयी ज्यांना आक्षेप असेल, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. भाजपने संख्याबळाच्या जोरावर लोकसभेत हे विधेयक मंजूर करून घेतले असले तरी राज्यसभेतील या विधेयकाचा मार्ग खडतर आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्यसभेतील विरोधकांनी एकजूट दाखवत राष्ट्रपतींकडे हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचे निवेदनही सादर केले होते. मात्र, विरोधक केवळ राजकीय फायद्यासाठी ही अडवणूक करत असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला होता. त्यांनी अण्णा हजारेंसह विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते.