आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्य़ातील पालखी मार्गावर ठरावीक प्रत्येक भागासाठी एका नियोजन अधिकाऱ्याची (इन्सिडेंट कमांडंट) नियुक्ती करण्यात आली आहे. हा अधिकारी आणि त्यांचा चमू यांच्याकडे संबंधित भागातील वारकऱ्यांसाठी असलेल्या विविध सोयी, सुविधांच्या नियोजनाचे काम असेल. दरम्यान, येत्या २० जूनपासून वारकरी आणि सर्व नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाचे पालखी अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येणार आहे.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे २४ जूनला प्रस्थान ठेवणार आहे. ६ जुलै रोजी या पालखी इंदापूरहून सोलापूर जिल्ह्य़ाकडे मार्गस्थ होणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २५ जून रोजी प्रस्थान ठेवणार असून २ जुलैपर्यंत ही पालखी जिल्ह्य़ात आहे. दोन्ही पालख्या जिल्ह्य़ात असताना विविध भागांसाठी एकेका नियोजन अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हा प्रशासनाने केली आहे. उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. याबरोबरच उपनियोजन अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांचा चमू असेल.या नियोजन अधिकाऱ्यांकडे असलेल्या भागात वारकऱ्यांसाठी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वीजजोडणी, वाहतूक, अन्न, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अशा विविध यंत्रणांशी समन्वय साधून सुविधा देण्याचे काम आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी गुरुवारी दिली. पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यामुळे ज्या भागातून पालखी मार्गस्थ होणार आहे, त्या भागात एका नियोजन अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पालखी अ‍ॅप गुरुवारपासून कार्यान्वित होणार

गेल्या दोन वर्षांपासून वारकरी आणि सर्व नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘पालखी सोहळा अ‍ॅप’ उपलब्ध करुन देण्यात येते. यंदा हे अ‍ॅप २० जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच हे अ‍ॅप वापरणे शक्य नसणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याचे नियोजन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी असलेली पुस्तिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही पुस्तिका तयार झाल्यानंतर ती दोन्ही पालख्यांचे विश्वस्त आणि वारीमध्ये वारकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.