रेणू शर्मा यांनी कार्यभार स्वीकारला

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकपदी रेणू शर्मा यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे रेल्वेच्या इतिहासात प्रथमच व्यवस्थापकपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे.

शर्मा या भारतीय रल्वे कार्मिक सेवेच्या १९९० मधील तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पुणे विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्या लखनऊ येथे मुख्य कार्मिक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. रेल्वे सेवेमध्ये त्यांनी पूवरेत्तर रेल्वे, उत्तर रेल्वे, मॉडर्न रेल कोच फॅक्टरी, रायबरेली आणि आरडीएसओ येथे विविध पदांचा कार्यभार पाहिला आहे. मानव संसाधन संबंधित कामांचे संगणकीकरण करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याचप्रमाणे आरडीएसओच्या पेन्शनधारकांसाठी त्यांनी एक मोबाईल कार्यक्रमही तयार केला आहे. शर्मा यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस त्याचप्रमाणे सिंगापूर आणि मलेशिया येथील प्रगत व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे.

रेल्वे गाडय़ांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक, प्रवाशांसाठी सुविधा तसेच उत्पन्नात वाढ करण्याला प्राधान्य देणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. प्रवाशांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.