|| तानाजी काळे

बदलत्या हवामानाचा फटका; निरीक्षकांना यंदा आणखी काही काळ वाट पाहावी लागणार :- यंदा लांबलेला पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका उजनी जलाशयावर हक्काने दरवर्षी न चुकता येणाऱ्या पाहुण्या परदेशी पक्ष्यांच्या आगमनाला बसला आहे.

ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला असंख्य परदेशी स्थलांतरीत पक्षी उजनी जलाशयावर गर्दी करतात. हौशी छायाचित्रकार आणि पक्षी निरीक्षक पक्ष्यांच्या या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहून त्याचा आनंद लुटतात. मात्र, या पर्वणीसाठी पक्षी निरीक्षकांना यंदा आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात ठिकठिकाणी परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाने रौद्र रूप धारण केले. समुद्रातही अनेक वादळे निर्माण झाल्याने युरोप खंडातून आशियाई देशांकडे वळणाऱ्या पक्ष्यांच्या आगमनाला विलंब होणार असल्याचे पक्षी निरीक्षकांचे अनुमान आहे.

युरोपात बर्फवृष्टी सुरू झाली, की बहुतांश पक्षी आशियाई देशाकडे वळताना भारताला विशेष पसंती देतात. प्रामुख्याने ते महाराष्ट्राचा परिसर व्यापून टाकतात. त्यामध्ये उजनी जलाशय हे त्यांचे आवडते आणि हक्काचे ठिकाण आहे. मात्र यंदा उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या उजनीच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होणार नसल्याने पाणी जास्त उपलब्ध असल्यामुळे ही परिस्थिती या पक्ष्यांना खाद्य मिळवण्यासाठी अनुकूल ठरत नाही.

येथील पाणी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाणथळी पक्ष्यांच्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेला सोयीस्कर असतात. मात्र यंदा उजनी जलाशयात अशा पाणथळी निर्माण होण्यास बराच अवधी असल्याने उजनी जलाशयावर हे पक्षी उशिराने येणार आहेत. तरीही आजूबाजूला बहुतांश ठिकाणचे तलाव, ओढे, नाले पावसाने तुडूंब भरून आता तेथील पाणी कमी होत दलदलीची ठिकाणे निर्माण होऊ लागल्याने हे पक्षी काही काळ त्या परिसरात वास्तव्य करतील, असा उजनी काठच्या पक्षी निरीक्षकांचा अंदाज आहे.

पक्षी निरीक्षकांची निराशा

उजनी जलाशयावर दरवर्षी विविध जाती प्रजातीच्या पक्ष्यांचे मोठय़ा संख्येने आगमन होत असले, तरी काही वर्षांपूर्वी दुर्मीळ अशा तपकिरी डोक्याच्या कुरवाने (ब्राउन हेडेट गल) उजनीच्या सौंदर्यात भर घातली होती. तो कायम दिसायचा, मात्र अलीकडे तपकिरी डोक्याच्या कुरवाने उजनीकडे पाठ फिरवल्याने पक्षी निरीक्षकांची निराशा झाली आहे.