News Flash

मांजरआख्यान!

कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर.

बेंगाल

कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षिजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती   चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक दारांआड तरी या वाघाच्या ‘पाळीव’ मावशीचा वावर असायचा. अन् अनेक घरांचा तिच्यावर मौखिक दावा असायचा. गंमत म्हणजे हा दावा असणारे मांजर मालक असल्याच्या भ्रमात राहणाऱ्या प्रत्येक घराला चकवा देत ऐटीत बागडायचे. चार घरांतील स्वयंपाकघरात आवश्यक पदार्थाची हक्कवसुली, सात उंबऱ्यांमध्ये फिरवत त्या घरांत पिल्लांना दाखवत गुपचुप गुडूप होण्याची कसरत करणारी मांजरे प्रत्येकाच्या स्मृतिकोशात दडली असतील. खाणे हवे असले, लाड करून हवे असले की जवळ येणारे आणि एरवी जगातल्या कोणालाही फुकटचा भाव न देता आपल्या जागेवर पहुडणे हे या प्राण्याचे सार्वत्रिक वैशिष्टय़.  मांजर पाळीव असले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबऱ्यांवरचा भटका शिरस्ता आजही गाव आणि शहरांत सारखाच आहे. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे शहरी-निमशहरी भागांमध्ये कुत्र्याप्रमाणेच घरामध्ये जाणीवपूर्वक मांजर बाळगले जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाऱ्या मांजरींचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाऱ्या मांजरामध्ये परावर्तित झाले आहे.

लोकांमध्ये मांजराच्या बाबतीत अनेकदा टोकाच्या भूमिका  दिसतात.  मांजर अत्यंत आवडते असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो. तर नावडते असल्यास तिच्या कोणत्याही वर्तवणुकीबाबत हातातली वस्तू फेकून मारावी इतका संताप येतो. घरा, वाडय़ांमध्ये आगंतुक येणारे मांजर उंच इमारतींमधील फ्लॅटमध्ये दुरापास्त बनल्यानंतर आज मांजर विकत घेऊन पाळण्याचे प्रमाण वाढत आहे.

आपल्याकडे स्थानिक प्रजातीच्या मांजरात बरेच वैविध्य पाहायला मिळते. रंग, केस, आकार, गुणवैशिष्टय़े असे वैविध्य असूनही त्याच्या नेमक्या प्रजातींची किंवा वंशावळीची नोंद करण्यातच आलेली नाही. त्यामुळे गावठी किंवा देशी मांजर आणि परदेशी प्रजाती अशी ढोबळ वर्गवारी केली जाते. स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद असलेल्या मांजरांमध्ये आपल्याकडे मिळणाऱ्या मांजरांची गुणवैशिष्टय़े दिसत असली, तरीही त्याची भारतीय प्रजाती म्हणून नोंद नाही. पाळीव मांजरातील स्वतंत्र प्रजाती म्हणून साधारण ७३ प्रजातींची नोंद जगात वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा आहे. नोंद झालेल्यापैकी जवळपास ४० प्रजाती या अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे. हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी गुणवैशिष्टय़े दिसली, तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.

हॉलिवूडपटांचा वाटा

भारतातील परदेशी मांजरांचे वेड वाढवण्यात हॉलीवूडपटांनी मोठा वाटा उचलला आहे. ‘स्टुअर्ट लिटिल’ या चित्रपटानंतर पर्शिअन, बॉबटेल या प्रजातींच्या मांजराची मागणी वाढली. ‘प्रिन्सेस डायरी’ या चित्रपटानंतर पांढरे अंग आणि काळे तोंड असणारे रॅग डॉल मांजर आपल्याकडे पसंतीस उतरले. आता हळूहळू इतरही अनेक वंशावळीची मांजरे भारतात आपले बस्तान बसवू लागली आहेत. येथेच त्यांचे ब्रिडिंगही होऊ लागले आहे. देशी मांजराशी ब्रिडिंग होऊन काही नव्या प्रजातीही जन्माला येत आहेत. घरी मांजर ठेवणे या पलिकडे जाऊन त्याच्यासाठी तयार खाणे, कपडे, शाम्पू, पावडर अशी उत्पादने आणि पार्लर, हॉस्टेल अशा सेवांनी भारतीय बाजारात जम बसवला आहे.

परदेशी मांजरांचे वेड

साधारणत: गेल्या दोन दशकांपासून आपल्याकडे परदेशी मांजरे मार्जारप्रेमींच्या घरी लाडोबा झाली आहेत. पर्शियन ही मूळ इराणमधील प्रजाती, तुर्किश अंगोरा ही तुर्कस्तानात मूळ असलेली प्रजाती, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, माइन कून, रॅग डॉल या अमेरिकन प्रजाती, सयामी ही थायलंडमधील प्रजाती पाळण्याकडे सध्या प्राणिप्रेमींचा कल आहे. बहुतेक घरात ‘बेंगाल’ या प्रजातीची मांजरे असतात. ही मांजरे बहुतेकदा आपल्या कबऱ्या, ठिपकेवाल्या देशी मांजरांशी साधम्र्य असलेली असतात. त्याचप्रमाणे पूर्ण काळी कुळकुळीत आणि हिरवे डोळे असलेली ‘बॉम्बे’ या प्रजातीशी साधम्र्य असलेली मांजरेही दिसतात. मात्र बेंगाल किंवा बॉम्बे अशी नावे असली, तरी याची नोंद अमेरिकन प्रजाती म्हणून आहे. या सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी दिसणारी, गुबगुबीत-गोंडस या मांजराच्या प्रतिमेला काहीसा छेद देणारी कॅनडामधील स्फिंक्स ही प्रजातीही भारतीय मांजरप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे, अशी माहिती डॉ. गौरव परदेशी यांनी दिली.  साधारणपणे किमान ५ हजार ते कमाल ८० हजार या अशा किमतीत ही मांजरे मिळतात.

Untitled-44

 

– रसिका मुळय़े

rasika.mulye@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:12 am

Web Title: article on cat
Next Stories
1 आयटी कंपन्यांवर खैरात; करदाते मात्र वाऱ्यावर
2 बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड काढणारे अटकेत
3 ‘नापास’ झालेली विद्यार्थिनी महाविद्यालयात पहिली
Just Now!
X