प्रथमेश गोडबोले

पूर्वी नारळी बाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या स्वारगेट जवळच्या मुकुंदनगर परिसरात सुजय गार्डन सोसायटी आहे. शहराच्या मध्य भागात असूनही सोसायटीच्या आवारात मुबलक झाडे आहेत. विशेषत: नारळाच्या झाडांमुळे या सोसायटीच्या सौंदर्यात भर पडली आहे. सोसायटीमध्ये वर्षभर विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. हे सर्व कार्यक्रम लहान मुले आणि महिला आयोजित करतात. क्लब हाऊस, बाग, जलतरण तलाव, वॉकिंग ट्रॅक, कचरा प्रक्रिया प्रकल्प अशा सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही सोसायटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रित वास्तव्य असल्याने सोसायटीच्या सदस्यांमध्ये आणि कौटुंबिक नाते तयार झाले आहे.

Pune, Fire in Bohri area,
पुणे : बोहरी आळीत आग; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले
School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली
Amravati, Tragedy, Two Youths Drown , rodga party , gudi Padwa Celebration, malkhed pond, amravati news, Two Youths Drown in Amravati, Sawanga Vithoba, malkhed pond news, marathi news,
अमरावती : ‘रोडगा पार्टी’ जीवावर बेतली; दोन तरूण तलावात बुडाले
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी

सुजय गार्डन सोसायटी स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर परिसरात आहे. सोसायटीच्या ११ इमारती आणि ५० बंगले असून अडीचशे सदनिका आहेत. साडेदहा एकर परिसरामध्ये सोसायटीचा विस्तार आहे. मुकुंदनगरमध्ये सध्या ज्या ठिकाणी सोसायटी आहे, तो परिसर पूर्वी ‘नारळी बाग’ म्हणून प्रसिद्ध होता. सोसायटी बांधताना काही नारळांच्या झाडांची फेरलागवड करण्यात आली आहे. सध्या सोसायटीमध्ये तब्बल ७० नारळाची झाडे आहेत. या नारळाच्या झाडांमुळे सोसायटीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सोसायटीमध्ये साडेआठशे मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक आहे.

सोसायटीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रींचे आगमन झाल्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल सोसायटीमध्ये असते. सोसायटीमधील महिला आणि मुलांकडून वाद्यवृंदाचे आयोजन करण्यात येते. वन मिनिट शो, टॅलेंट शो यांचेही आयोजन करण्यात येते. अल्पोपाहारही आयोजित केला जातो. गणेशोत्सवात सादर केले जाणारे खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम सोसायटीमधील मुले, महिलांकडूनच आयोजित केले जातात. बाहेरून कोणत्याही व्यक्ती, संस्था वा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अशा कोणालाही बोलावले जात नाही. टॅलेंट शोमध्ये सोसायटीमधील प्रत्येक जण एक ते तीन मिनिटांत आपली कला सादर करतो. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सदस्य उस्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामध्ये तबला, मिमिक्रीपासून खेळांपर्यंत कोणत्याही प्रकारची कला सादर करण्याची संधी सदस्यांना असते. सोसायटीमधील सदस्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. नवरात्रात एक दिवसाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाला केवळ सोसायटीच्या सदस्यांनाच सहभागी होण्याची संधी असते. दांडिया रास, गरबाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात सहभागी होणारे दांडिया, गरबासाठी आवश्यक असणाऱ्या पारंपरिक वेशातच खेळण्यासाठी येतात. या वेशासाठी पारितोषिकेही दिली जातात. सोसायटीच्या उत्सवाचे अध्यक्ष अश्विन शहा आहेत.

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी सोसायटीमध्ये झेंडावंदनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात वर्षभरात सोसायटीमधील ज्या सदस्याने विशेष प्रावीण्य मिळवले असेल त्यांचा पारितोषिक देऊन यथोचित सत्कार केला जातो. तसेच मिळालेले विशेष प्रावीण्य, त्याचे वर्ष आणि सत्काराचा कार्यक्रम यांचा एक फ्लेक्स तयार करून सोसायटीच्या आवारात तो वर्षभरासाठी लावला जातो. सोसायटीच्या इतर सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाहेरील, तसेच सोसायटीमध्ये येणाऱ्यांना याबाबत माहिती होण्यासाठी हा फ्लेक्स लावला जातो.

या उपक्रमात शाळा, महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेपासून ते कोणत्याही क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या सर्वाचा सत्कार स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केला जातो. २६ जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यानंतर पेढे वाटून हा दिवस साजरा केला जातो.   सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडलेल्यांना सोसायटीच्या सदस्यांकडून विविध प्रकारची मदत केली जाते. वर्षभरातून एकदा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सुजय प्रीमिअर लिगचे आयोजन केले जाते. सोसायटीमधील इमारतींचे संघ करण्यापेक्षा आयपीएलनुसार संघप्रमुखांकडून खेळाडूंचा लिलाव होतो.

हा कार्यक्रमही मोठय़ा स्वरुपात होतो. या लिगमध्ये क्रिकेटचे सामने खेळले जातात. सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरू असल्याने भारताचे सर्व सामने सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मोठय़ा स्क्रीनवर सोसायटीमधील सदस्यांना दाखवले जाणार आहेत. या स्क्रीनवर सामूहिकरीत्या भारताचे सामने पाहण्यासाठी एक हजापर्यंत लोक जमतात आणि सामन्याची मजा लुटतात. दिवाळीमध्ये लहान मुलांकडून तीन-चार ठिकाणी मुलांच्या आवडीनुसार किल्ले तयार केले जातात.

सोसायटीमध्ये तयार होणारा कचरा सोसायटीमध्येच जिरवण्यासाठी कचरा प्रकल्पाची यंत्रसामुग्री विकत घेण्यात आली आहे. तेथे ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते. कचरा जिरवण्याचे यंत्र हांडेवाडी येथे असून, सोसायटीमधील ओला कचरा तेथे नेऊन, त्यापासून खतनिर्मिती केली जाते. हे खत सोसायटीमधील झाडांना दिले जाते. शिल्लक राहिलेले खत ज्यांना हवे असेल त्यांना विनामूल्य दिले जाते.

सोसायटीचे स्वत:चे क्लब हाऊस आहे. बागही आहे. बागेची योग्यप्रकारे निगा राखली जात असल्याने ती अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. जलतरण तलाव असून त्यामध्ये झुंबासारखे उपक्रम होतात. क्लब हाऊसमध्ये पूल टेबल, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, स्टीम बाथ अशा विविध सोयी-सुविधा आहेत. सोसायटीमध्ये धार्मिक कार्यक्रमही मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. सोसायटीमध्ये मंदिर असून त्याचा परिसरही मोठा आहे. सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तीन मंडळे आहेत. या मंडळांकडून वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जातात. या मंडळांच्या दर दोन महिन्यांनी सहली देखील जातात. भरत जैन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सचिव अश्विन शहा, तर राजेश शहा सहसचिव आहेत. शिल्पेश शहा खजिनदार, हरप्रित शहा, विजय गांधी हे सदस्य आहेत.