शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र महापालिकेत लावण्यासंबंधी आलेल्या ठरावावरून पक्षनेत्यांच्या बैठकीत सोमवारी वाद झाला. कोणाची तैलचित्र शासकीय इमारतींमध्ये लावावीत याची यादी तयार असून त्यात ठाकरे यांचे नाव नाही, असे कारण पुढे करून काँग्रेसने तैलचित्र लावण्याच्या ठरावाला विरोध केला. अखेर कोणताही निर्णय न घेता हा ठराव पुढे ढकलण्यात आला.
महापालिका पक्षनेत्यांची बैठक महापौर चंचला कोद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. सभागृहनेता सुभाष जगताप, काँग्रेसचे गटनेता व विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, मनसेचे गटनेता वसंत मोरे, भाजपचे गटनेता अशोक येनपुरे आणि शिवसेनचे गटनेता अशोक हरणावळ या बैठकीत उपस्थित होते. बैठकीतील कामकाजाची माहिती महापौरांनी पत्रकार परिषदेत दिली. देशातील अनेक राष्ट्रपुरुष तसेच नेत्यांची तैलचित्रे महापालिकेच्या मुख्य भवनात लावण्यात आली आहेत. तशाच पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही तैलचित्र महाापालिका भवनात लावावे, असा ठराव नगरसेवक योगेश मोकाटे यांनी दिला होता. हा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानंतर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी त्याला विरोध केला. त्यावर ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव मंजूर करा, असा आग्रह हरणावळ यांनी धरला. मात्र, शिंदे यांनी ठरावाला असलेली विरोधाची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे कोणताही निर्णय न घेता हा ठराव पुढे ढकलण्यात आला.
राज्य शासनाने शासकीय इमारतींमध्ये कोणाची तैलचित्रं लावायची याची चोवीस नावांची यादी तयार केली असून त्यांची तैलचित्रं बसवण्यास शासनाची परवानगी आहे. या यादीत ठाकरे यांचे नाव नाही. त्यामुळे या प्रस्तावाला विरोध असल्याचे शिंदे यांनी सांगितले.