पुणे विद्यापीठामध्ये घडणाऱ्या छेडछाडीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठामध्ये आता पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. त्यामुळे विद्यापीठातील अशा घटनांना थोडा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यापीठाच्या आवारातील मुख्य रस्त्यांवर विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना घडल्याचे समोर आले होते. त्या पाश्र्वभूमीवर काही विद्यार्थिनींनी विद्यापीठाकडे आणि पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाच्या आवारात आता पोलिसांनीही गस्त सुरू केल्याचे कळते आहे. मनुष्यबळाअभावी विद्यापीठाच्या आवारातील रस्त्यांवर विद्यापीठाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठात बसवण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरेही दर्जेदार नसल्यामुळे त्याचाही विद्यापीठाच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी फारसा उपयोग होत असल्याचे दिसत नाही. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
आता विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक, कंत्राटी सुरक्षा रक्षक आणि पोलीस अशा तीनही प्रणालींच्या माध्यमातून गस्त सुरू करण्यात आली आहे. दिवसा आणि रात्रीही पोलीस गस्त घालताना दिसत असल्याचे विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विद्यापीठातील कमी वर्दळीचे रस्ते, वसतिगृहांचा परिसर, बागा या ठिकाणी गस्त घालणे सुरू करण्यात आले आहे. दिवसाही गस्त घालण्यात येत आहे. मात्र, अजूनही सुरू करण्यात आलेली गस्त, उपलब्ध असलेली सुरक्षा प्रणाली ही विद्यापीठाच्या ४११ एकर परिसराच्या सुरक्षेसाठी पुरेशी नाही.
याबाबत पोलीस निरीक्षक आनंद साबळे यांनी सांगितले,‘‘विद्यापीठातील सुरक्षेच्यादृष्टीने विद्यापीठाच्या आवारात गस्त घालण्यात येत आहे. विद्यापीठाच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या सहकार्याने विद्यापीठाच्या आवाराच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाय करण्यात येत आहेत.’’