राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने सुरू केलेल्या वन्य प्राणी दत्तक योजनेत आतापर्यंत ‘नावडत्या’ ठरलेल्या वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यास काही हात पुढे येत आहेत, झाले आहेत. नुकतेच साळिंदराला एका प्राणिप्रेमी नागरिकाने दत्तक घेतले असून माकडाला दत्तक घेण्यासाठीही नागरिकांकडून चौकशी होत आहे.
या योजनेत बिबटय़ा, वाघ असे काही विशिष्ट प्राणीच दत्तक घेण्यास नागरिक उत्सुकता दाखवत असून काही प्राण्यांना दत्तक घेण्यास कुणीच तयार नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. या नावडत्या ठरलेल्या प्राण्यांमध्ये माकड, साळिंदर, भेकर, नीलगाय आणि घोरपडीचा समावेश होता. यातील साळिंदराला नुकतेच ‘पालक’ मिळाले आहेत.
प्राणिसंग्रहालयाच्या प्रशिक्षण अधिकारी अश्विनी शितोळे म्हणाल्या, ‘‘साळिंदरला स्वराज पेंढारकर या प्राणिप्रेमीने १ मार्च २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१५ या एका वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. साळिंदराचा एका वर्षांचा खर्च ६० हजार रुपये आहे. माकडाचे ‘पालक’ बनण्यासाठीही काही नागरिकांकडून चौकशी होत आहे. सामान्य नागरिकांना प्राणी दत्तक घेणे परवडावे यासाठी एका दिवसासाठीही ही योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत एका दिवसासाठी १७० रुपये शुल्क भरून जयमाला नायडू या प्राणिप्रेमीने घुबडाला दत्तक घेतले आहे.’’