News Flash

दिवाळीच्या तोंडावर एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याने नागरिक हवालदिल

देशातील बहुतेक बँकाच्या एटीएम कार्ड्स संबंधीची माहिती चोरीला गेली होती.

नुकसान भरपाई देण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

एटीएम कार्ड संबंधित माहिती चोरली गेल्यामुळे काही बँकांकडून एटीएम कार्ड बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे खात्यातून पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारीही बँकांकडे येत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक बँकांनी कार्ड ब्लॉक केल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

देशातील बहुतेक बँकाच्या एटीएम कार्ड्स संबंधीची माहिती चोरीला गेली होती. यामध्ये काही नागरिकांच्या खात्यातून रकमांचे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी बँंकाकडे आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर संशयास्पद व्यवहार वाटणारी लाखो कार्ड बँकांनी बंद केली आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्राहकांना सूचना देऊनही त्यांनी पासवर्ड बदलला नाही, त्यांचीही कार्ड बंद करण्यात आली आहेत. मात्र दिवाळीच्या तोंडावर अचानकपणे कार्ड बंद झाल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. नव्या कार्डसाठी अर्ज करून ते प्रत्यक्षात हाती येण्याच्या प्रक्रियेमध्ये किमान आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. काही बँंकानी या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर आपल्याच एमटीएममधून पैसे काढता येतील अशी सुविधा केली आहे.

ग्राहकांची काहीच चूक नसताना त्यांना नुकसान सोसावे लागत असल्यामुळे बँकांनी ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी. ज्यांची कार्ड बंद करण्यात आली आहेत, त्यांना तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी. ग्राहकांचे जेवढय़ा रकमेचे नुकसान झाले असेल ती रक्कम बँंकांनी भरून द्यावी. या पाश्र्वभूमीवर ज्या नागरिकांचे पैसे गेले आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, दिवाळीच्या खरेदीसाठी तत्काळ नवी एटीएम कार्ड उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे.

याबाबत पंचायतीचे विजय सागर यांनी सांगितले, ‘पुण्यातील काही तक्रारी समोर आल्या आहेत. काही नागरिकांच्या खात्यातील रकमाही या प्रकारात गेल्या आहेत. या प्रकारात ग्राहकांची काहीच चूक नाही. बँकांनी सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे ग्राहकांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारात ग्राहकांना विम्याची सुरक्षा असते मात्र त्याची मर्यादा १ ते २ लाखापर्यंत आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम गेलेल्या नागरिकांचे नुकसान होणार आहे.

त्यामुळे बँकांनी हे नुकसान भरून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सध्या लाखो कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना पैसे काढायला अडचणी येत आहेत. त्यामुळे ज्यांची कार्ड ब्लॉक झाली आहेत त्यांना बँंकांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी ग्राहक पंचायतीशी संपर्क साधल्यास त्यांना पुढील प्रक्रियेसाठी मदत करण्यात येईल.’

काय काळजी घ्या

  • पासवर्ड बदलण्याबाबत बँकांकडून एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • खात्यावर गेल्या काही दिवसांत झालेले व्यवहार तपासा. पासबुकातील नोंदी अद्ययावत करून घ्या.
  • काही गैरव्यवहार झाले असल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.
  • कार्ड बंद झाले असल्यास नवे कार्ड मिळण्यासाठी बँकेशी संपर्क साधा.
  • खात्यातील रकमेचा अपहार झाला असल्यास तक्रार करण्याबरोबरच बँकेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठीही अर्ज करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:55 am

Web Title: atm card block issue
Next Stories
1 पिंपरीत महापौर विरूध्द राष्ट्रवादी
2 सेनेची स्वबळावर सत्ता येईल – निम्हण
3 ज्योतिषांच्या नादाला लागल्यामुळेच अजित पवारांकडून कुंडल्या काढण्याची भाषा
Just Now!
X