करोना विषाणूने सर्वांच्या हातचा रोजगार हिरावून घेतला आहे. रिक्षावाल्यांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. असं असलं तरीही पुण्यात एका रिक्षावाल्या काकांच्या माणुसकीचं दर्शन घडलं आहे.  रिक्षाचालक विठ्ठल मापरे यांच्या रिक्षात तब्बल ११ तोळे असलेली बॅग एका दांपत्याकडून विसरली. ती बॅग मापरे यांनी पोलिसांनीकडे दिली. त्यानंतर पोलिासंनी संबंधित दांपत्यास ही बॅग परत केली. तसंच या प्रामाणिक रिक्षाचालक काकांची दखल पोलीस उपयुक्त सुहास बावचे यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कार देखील केला.११ तोळे सोनं असलेली बॅग रिक्षावाल्या काकांनी परत करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शनच घडवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील लोणकर वस्ती येथून मेहबूब शेख हे पत्नी सोबत हडपसर येथे एका कामासाठी MH 12 NW ३५०५ या रिक्षातून दुपारच्या सुमारास निघाले होते. काही वेळाने शेख हे हडपसर येथे उतरले आणि तेथून MH 12 NW ३५०५ चे रिक्षाचालक विठ्ठल मापरे हे बी. टी. कवडे रोडवरील रिक्षा स्टॅन्ड वर आले. त्यानंतर ते चहा घेण्यासाठी गेले आणि काही वेळाने रिक्षा मध्ये येऊन बसले. मापरे यांना मागील बाजूस एक बॅग दिसली. त्या बॅगमध्ये नेमके काय असावे या विचारात ते होते. बराच वेळ त्यांनी बॅग घेण्यास कोणी येते का ? ते पाहिले आणि त्यानंतर त्यांनी घोरपडी गाव पोलीस चौकीत बॅग आणून दिली. त्या बॅगमध्ये ११ तोळे सोने, २५० ग्रॅम चांदी आणि २० हजार रोख रक्कम आढळून आली.

त्यानंतर हडपसर पोलिसाना देखील अशा प्रकारची बॅग एका रिक्षा चालकाने आणून दिली आहे. जर आपल्याकडे कोणी तक्रार देण्यास सांगावे. त्यांनतर काही वेळाने संबधीत दांपत्य पोलीस चौकीला येऊन त्यांच्या वस्तूची ओळख पटवून बॅगमधील सर्व वस्तू त्यांच्याकडे देण्यात आले असल्याचे मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी दिली.