पुणे : नारायण पेठ भागातून रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे पंधरा तोळ्यांचे दागिने, मोबाइल संच असलेली पिशवी रिक्षात विसरली. पिशवी विसरल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या महिलेला क्षणभर काय करावे, हे सुचले नाही. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. देवावर हवाला ठेवला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. नारायण पेठ भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तेवढय़ात रिक्षाचालक प्रवासी महिलेची पिशवी घेऊन नारायण पेठेत आला आणि रिक्षात विसरलेली पिशवी त्याने महिलेला परत केली. पोलीस आणि रिक्षाचालकाच्या प्रयत्नांमुळे महिलेला हरवलेला ऐवज परत मिळाल्याने तिने त्यांचे मनोमन आभार मानले.

आरती अरुण कदम (वय ४८, रा. हंसनगर, ठाणे) या नातेवाइकांकडे असलेल्या मंगलकार्यासाठी रविवारी (२९ एप्रिल) पुण्यात आल्या होत्या. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथून त्या सकाळी रिक्षाने नारायण पेठेत आल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास केसरी वाडय़ानजीक त्या रिक्षातून उतरल्या. गडबडीत त्या रिक्षात ठेवलेली पिशवी घ्यायच्या विसरल्या. दरम्यान, रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. पिशवी विसरल्याचे लक्षात आल्यानंतर कदम घाबरल्या. क्षणभर काय करावे हे सुचले नाही. नेमक्या त्या वेळी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुधीर भिलारे, प्रकाश ओव्हाळ तेथून गस्त घालण्यासाठी निघाले होते.

नारायण पेठ पोलीस चौकीसमोर थांबलेल्या कदम यांच्याकडे त्यांनी विचारपूस केली. तेव्हा रिक्षात विसरलेल्या पिशवीत पंधरा तोळयांचे दागिने, दोन मोबाइल संच आणि मनगटी घडय़ाळे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलीस शिपाई भिलारे आणि ओव्हाळ यांनी कदम यांना रिक्षाचा क्रमांक विचारला. तेव्हा कदम यांनी रिक्षाचा क्रमांक माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भिलारे आणि ओव्हाळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून केळकर रस्ता भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली. कदम यांना केळकर रस्त्यावर सोडणाऱ्या रिक्षाचा क्रमांक चित्रीकरणात आढळला. त्यानंतर रिक्षाक्रमांकावरून त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाचे नाव सागर प्रकाश बिबवे (वय ३६, रा.वडगाव बुद्रुक , सिंहगड रस्ता) असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी कदम यांना रिक्षात विसरलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना दिली. कदम याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. दरम्यान रिक्षाचालक बिबवे याला प्रवासी महिलेची पिशवी रिक्षात विसरल्याचे निदर्शनास आले. बिबवे पुन्हा नारायण पेठेत आले. त्या वेळी तेथे कदम थांबल्याचे त्यांनी पाहिले. कदम यांना बिबवे भेटले. त्यांना रिक्षात विसरलेली पिशवी परत केली.

पिशवीत असलेल्या ऐवजाची पाहणी केल्यानंतर कदम यांनी त्यांचे आभार मानले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक जे. के. जगताप, भिलारे, ओव्हाळ यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक कदम यांनी केले. पोलीस आणि रिक्षाचालकाच्या प्रयत्नांमुळे पिशवी परत मिळाली, असे कदम यांनी सांगितले.