शहरातील रस्त्यांची चाळण; पोलिसांकडून महापालिकेला खड्डय़ांची छायाचित्रे सादर

शहरात  गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर असलेल्या खड्डय़ांची माहिती तसेच छायाचित्रे पोलिसांनी महापालिका प्रशासनाला पाठविली असून खड्डे पडलेले रस्ते आणि चौकांची यादीच महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहनचालक खड्डय़ातून वाट काढत जात आहेत. अरुंद रस्ते तसेच पावसामुळे रस्त्यांवर मोठय़ा संख्येने येत असलेल्या मोटारींमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

शहरातील अनेक चौकांत कोंडी होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. कर्वे रस्ता, पौड रस्ता, बंडगार्डन रस्ता, राजा बहादूर मिल रस्ता परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते तसेच प्रमुख चौकांत पडलेल्या खड्डय़ांची छायाचित्रे महापालिका अधिकाऱ्यांना पाठविली आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

कर्वे रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. नळस्टॉप चौकात खड्डे पडले आहेत तसेच महापालिका भवन परिसरात मेट्रोचे काम सुरू असून खड्डय़ांमुळे महापालिका भवन ते शिवाजीनगर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत खड्डे पडले आहेत.

शहराचा मध्यभागासह बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाऊस ओसरला असून भर पावसात खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. खड्डे बुजविण्यासाठी डांबर मिश्रित खडी ओतण्यात आली असून खडी खड्डय़ातून बाहेर पडल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांनी जीव मुठीत धरून रस्त्यांवरून मार्गक्रमणा करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांनी खड्डे पडलेले चौक आणि रस्त्यांची छायाचित्रे तसेच त्यांची यादी सादर केली आहे.

त्यातील काही रस्ते व चौक पुढीलप्रमाणे- संचेती चौक, संचेती चौक भुयारी मार्ग, शिवाजीनगर न्यायालय ते वेलस्ली पूल, डेंगळे पूल (साठे चौक), महापालिका भवन ते साठे चौक, वीर चापेकर चौक (गणेशखिंड रस्ता).

बाजीराव रस्ता (अप्पा बळवंत चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त चौक, गांजवे चौक), टिळक रस्ता (बादशाही चौक, साहित्य परिषद चौक, न्यू इंग्लिश स्कुल चौक).

महेश सोसायटी चौक, शारदा आर्केड चौक, चिंतामणीनगर (बिबवेवाडी), शंकरशेठ रस्ता (प्राप्तिकर भवन), सातारा रस्ता (लक्ष्मीनारायण चौक, साईबाबा मंदिर, मार्केटयार्ड चौक), पुणे-सातारा रस्ता (कात्रज डेअरी चौक, भारती विद्यापीठासमोर, अहिल्यादेवी चौक, चव्हाणनगर चौक, पद्मावती चौक), कात्रज बाह्य़वळण मार्ग वंडर सिटी चौक, भारती विद्यापीठ परिसर (त्रिमूर्ती चौक ते दत्तनगर रस्ता), राजस सोसायटी, गोकुळनगर चौक, कात्रज पीएमपी थांबा ते कोंढवा रस्ता.

सर्किट हाऊस चौक (क्वीन्स गार्डन), साधू वासवानी चौक, शाहीर अमर शेख चौक, आरटीओ चौक, बोल्हाई चौक, कौन्सिल हॉल चौक, ब्लू नाईल चौक, मोरओढा चौक, अलंकार चौक, आयबी चौक (बंडगार्डन परिसर), संपूर्ण बंडगार्डन रस्ता दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर, कोरेगाव पार्क परिसर (नॉर्थ मेन रस्ता, एबीसी फार्म चौक), ब्ल्यू डायमंड चौक ते कोरेगाव पार्क चौक, साधू वासवानी पूल.

पौड रस्ता (कोथरूड डेपो चौक, इंदिरा शंकर नगरी चौक, परमहंसनगर चौक, पौड फाटा चौक), विधी महाविद्यालय रस्ता (आठवले चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक, लागू बंधू दुकानासमोर, कर्वे पुतळा चौक, कोकण एक्सप्रेस हॉटेलसमोर, डहाणूकर कॉलनी चौक).

पर्णकुटी चौक, सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, गुंजन चौक (येरवडा).

नगर रस्ता (कॉमरझोन चौक, सिद्धेश्वर चौक, डॉ. आंबेडकर चौक), संगमवाडी पूल पार्किंग, वडगाव शेरी चौक.

औंध रस्ता, विद्यापीठ चौक, विद्यापीठ उड्डाणपूल, पाषण रस्ता, शिवाजी चौक, औंध स्पायसर चौक, बाणेर रस्ता.

पुणे-सोलापूर रस्ता, मगर पट्टा रस्ता, सासवड रस्ता, रामटेकडी, सोपाननगर, मम्मा देवी चौक, काळूबाई चौक, सोलापूर बाजार चौक, मुंढवा, मगरपट्टा रस्ता, जहाँगीर नगर चौक.

तात्पुरत्या उपाययोजनांमुळे पितळ उघडे

शहरातील प्रमुख चौक तसेच महत्त्वांच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ात पाणी साठत आहे. खड्डय़ातील खडी रस्त्यावर येऊन पडली आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. खड्डे तसेच साठलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.