रस्त्याचे काम पुढील आठवडय़ात

सिंहगड  घाट रस्त्याचे पावसामुळे लांबणीवर पडलेले काम पुढील आठवडय़ापासून सुरू करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वरच्या भागातील दुरुस्ती करण्यात येणार असल्याने दुरुस्तीच्या काळात घाट रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या काळात पर्यटकांना गडावर जाता येणार नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिल्यानंतर घाट रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

सिंहगडावर वर्षभर पर्यटकांची रीघ असते. पावसाळ्यात आणि विशेषत: उन्हाळी व दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये गडावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. पावसाळ्यात गडावरील कडेकपारीतील सैल झालेले दगड घाट रस्त्यात येतात. तसेच काही प्रमाणात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठिकठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे आणि गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असल्याने रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे काही दिवस गडाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवस दुरुस्तीचे काम करण्यात आले. सुमारे दोन वर्षांपासून गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे सुरू आहेत. दीड महिन्यापासून पाऊ स बंद झाला, तरीही रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला निधीचे कारण सांगून अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.   गडाच्या पायथ्यापासून काही किलोमीटर अंतरापर्यंतचा रस्त्या चांगला आहे. मात्र, पुढे वळणावर मोठे खड्डे आहेत. तर, गडाकडे जाणाऱ्या वरच्या भागात खडी आणि त्याच्या भुग्याचे प्रमाण अधिक असल्याने दुचाकींसह चारचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परिणामी अनेक वेळा घाट रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिंहगड घाट रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने कामाला सुरुवात केली जाईल. कामादरम्यान काही दिवस गडाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा करून कामाला सुरुवात करण्यात येईल.   – धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग