‘‘आपल्याकडे क्रिकेट सोडला तर इतर खेळात जाणे म्हणजे जोखीमच आहे! पण बॅडमिंटन हळूहळू वाढते आहे. हा अवघड खेळ आहे. पण जर मी खेळू शकते, तर तुम्ही का नाही?’’ असे म्हणत फुलराणी सायना नेहवालने नवीन मुलामुलींना ‘बॅडमिंटनकडे वळा’ असा संदेशच दिला.
‘सूथ हेल्थकेअर’ने बाजारात आणलेल्या ‘परी’ या सॅनिटरी नॅपकीन ब्रँडची सायना ‘ब्रँड अॅम्बॅसडर’ आहे. या उत्पादनाच्या उद्घाटनासाठी ती बुधवारी पुण्यात आली होती. उद्घाटनानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधला.
अगदी साधा पोषाख, सतत हसरा आणि आत्मविश्वासाने झळकणारा चेहरा आणि कोणत्याही प्रश्नाला मोकळेपणे आणि सविस्तर दिलेल्या उत्तरांमधून सायनाने सगळय़ांचेच लक्ष वेधून घेतले. ती म्हणाली, ‘‘आपल्या देशात क्रिकेटसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. एक क्रिकेट सोडला तर बाकीचे खेळ म्हणजे ‘रिस्क’ आहे! बॅडमिंटनसाठी आपल्याकडे साध्या सुविधाही नाहीत. चीन, कोरिया, मलेशियाचे बॅडमिंटनपटू नेत्रदीपक यश मिळवतात. पण त्यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी बऱ्याच अॅकॅडमी आहेत. त्यांच्या एका प्रशिक्षकाकडे केवळ चार-पाच खेळाडू असतात. आपल्याकडे एक प्रशिक्षक ४०-५० खेळाडूंना शिकवतो. अशी परिस्थिती असली तरी बॅडमिंटन हळूहळू वाढते आहे याचा आनंद वाटतो. पण या खेळाला आणि एकूणच क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना प्रोत्साहनाची फार गरज आहे. प्रसारमाध्यमेही क्रिकेटला जितके झुकते माप देतात तसे त्यांनी इतरही खेळांकडेही लक्ष द्यायला हवे.’’
‘पुणे माझे आवडते!’
पुणे शहर कसे वाटते, असे विचारल्यावर सायना म्हणाली, ‘‘मी पुण्यात अनेकदा येऊन गेले आहे. अनेक ज्युनिअर चॅम्पियनशिप्स इथे खेळले आहे. जिंकलेही आहे. हे शहर खूप सुंदर आहे. हैदराबादपासून पुणे जवळही आहे. त्यामुळे मला पुण्यात यायला खूप आवडते.’’
‘आत्मविश्वास हवाच’
‘मी खूपशा उत्पादनांच्या जाहिरातीत झळकले आहे. पण सॅनिटरी नॅपकीनचा ब्रँड मी पहिल्यांदाच सादर करते आहे,’ असे सांगून सायना म्हणाली, ‘‘मी स्वत: मुलगी असल्यामुळे मुलींपुढे कोणकोणत्या समस्या असू शकतात हे मला चांगले माहीत आहे. त्यातही तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला आणखीनही अडचणी येऊ शकतात. पण काहीही असले तरी आपल्यात आत्मविश्वास असायला हवा. कोणताही सामना मी आत्मविश्वासाने खेळते आणि जिंकतेही! मुलींना माझ्यामुळे प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी यासाठी मी नेहमी प्रयत्न करीन.’’