News Flash

सुगंधी सुपारीवरची बंदी कागदावरच!

शहरातील विविध पानटपऱ्यांमध्ये किवामयुक्त पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरच उरली आहे.

| January 9, 2014 02:55 am

शहरातील विविध पानटपऱ्यांमध्ये किवामयुक्त पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरच उरली आहे. पाच महिन्यांनंतर शहरामध्ये किवामचा स्वाद असलेली पाने केव्हाही मिळत आहेत. एवढेच नव्हे तर, गुटखाबंदी असतानाही काही ठरावीक ग्राहकांना महागडय़ा दरात गुटखा सहजी मिळत असल्याने सरकारच्या बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू यावर राज्य सरकारने गेल्या वर्षी २० जुलै रोजी बंदी घातली. या विरोधात पानटपरीचालकांनी मोर्चा काढून ही बंदी मागे घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. पुण्यामध्ये मंडईतील टिळक पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. अनेक टपरीचालकांचा किवामयुक्त पान हाच मुख्य व्यवसाय असल्याने आमचे पोट त्यावरच अवलंबून आहे, अशीच पानटपरीचालकांची भावना असल्याने या बंदीला विरोध झाला. ही बंदी उठविण्यात यावी यासाठी अन्न आणि औषध विभागाचे मंत्री मनोहर नाईक यांच्याशी चर्चा झाली होती. या विषयावर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र, ही बंदी लागू झाल्यापासून पाच महिन्यांनंतरही किवामयुक्त पान ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे.
एके काळी लोकप्रिय असलेल्या मसाला पानाची जागा फुलचंद या पानाने घेतली. तोंडाला सुगंध आणणारा किवाम आणि चटणी हे मुख्य घटक या पानाची पसंती वाढविण्यास कारणीभूत ठरले. जुलैपूर्वी १० ग्रॅमची नवरतन किवामची बाटली ३५० रुपयांना होती. मात्र, बंदी लागू झाल्यापासून याच नवरतन किवामसाठी आता ५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे पानाच्या किमतीवर झाला असून पूर्वी १० रुपयांना मिळणारे फुलचंद पान आता १५ ते २० रुपयांना मिळत आहे. काही ठरावीक ग्राहकांना हे पान सहजगत्या उपलब्ध होते. किवाम हा प्रामुख्याने दिल्ली येथून येत असून त्याची गुपचूप विक्री होते. नवरतन किवाम याबरोबरच न्यू रतन आणि बुलेट असे किवामचे ब्रँडही उपलब्ध होत असल्याची माहिती पानटपरीचालकांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 2:55 am

Web Title: ban on scented betel nut is just on paper
टॅग : Ban
Next Stories
1 मेघडंबरीच्या उद्घाटनावरूनही मोठा वाद; कार्यक्रमाला विरोध
2 महापालिकेची लिफ्ट तपासणी; कधी होते, तर कधी होत नाही..
3 रस्त्यांच्या दुर्दशेबाबत वकिलांनी उठवला आवाज
Just Now!
X